‘‘एकेकाळी हॉकीचे सुवर्णयुग अनुभवणारा भारत गेल्या ३०-३५ वर्षांत बराच मागे पडला आहे. लहानपणी मी माझ्या प्रशिक्षकांकडून जे शिकलो, तीच पद्धत आताचे प्रशिक्षक वापरत आहेत. परदेशी संघांचा विचार केल्यास भारताला प्रशिक्षणाची पद्धत बदलावी लागणार आहे. हॉकी इंडिया लीगच्या निमित्ताने देशात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारत पुन्हा एकदा हॉकीत महासत्ता बनेल,’’ अशी आशा ऑलिम्पिक हॉकीपटू वीरेन रस्क्विन्हाने व्यक्त केली.
स्टार स्पोर्ट्सने हॉकीला नवी झळाळी देण्यासाठी १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या पर्वात एका सामन्यादरम्यान २० कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रस्क्विन्हा म्हणाला, ‘‘भारताच्या युवा खेळाडूंमध्ये अफाट गुणवत्ता आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये देवेंदर वाल्मीकी, गुरजिंदर सिंग, मनदीप सिंग, अमित रोहिदास या युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.’’