यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारत दोन अंकी पदकसंख्या गाठेल, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

‘‘ऑलिम्पिकच्या तयारीसाठी देशातील क्रीडापटूंना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा संस्मरणीय करण्याची जबाबदारी त्यांची असेल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. ऑलिम्पिकला १०० दिवस बाकी असल्यानिमित्ताने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. ऑलिम्पिकला २३ जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

‘‘टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी विक्रमी पदकांचे ठरेल. भारतीय खेळाडू दोन अंकी पदकसंख्या गाठतील, अशी आशा आहे. खेळाडूंना आवश्यक ते सर्व पाठबळ मिळेल, पण त्यांच्याकडून प्रयत्नांत कोणतीही कसूर होता कामा नये,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. देशातील करोना साथीपासून सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही रिजिजू यांनी खेळाडूंना दिला.

या कार्यक्रमाला क्रीडा सचिव रवी मित्तल, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते.

ऑलिम्पिकपात्र खेळाडूंचे लवकरच लसीकरण

*  ऑलिम्पिकपात्र खेळाडूंच्या लसीकरणाला लवकरच प्रारंभ होईल, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले. परंतु नेमकी केव्हा हे मात्र ते सांगू शकले नाहीत. ‘‘भारतीय ऑलिम्पिक पथकातील खेळाडू सुरक्षित राहावेत, यासाठी आम्ही लवकरच लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ करणार आहोत,’’ असे मेहता यांनी सांगितले.

दमदार कामगिरीची मनप्रीत, राणी यांना आशा

* ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे हॉकी संघ नक्कीच दमदार कामगिरी करतील, असा आशावाद पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांनी व्यक्त केला. गेल्या चार दशकांपासून भारताच्या एकाही हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आलेले नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत भारताने हॉकीमधील कामगिरी उंचावल्याने यंदा पदकाच्या अपेक्षा आहेत.

ऑलिम्पिकसाठी १०० दिवसांहून कमी अवधी

टोक्यो : टोक्यो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आता १०० दिवसांहून कमी अवधी शिल्लक आहे. बुधवारी टोक्योमध्ये ऑलिम्पिकसंबंधित ठिकठिकाणी फलक लावून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली. ‘‘जगभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतरही ऑलिम्पिकच्या आयोजनाची तयारी योग्य रीतीने सुरू आहे. विदेशी प्रेक्षकांना प्रवेश नसला तरी जपानमधील प्रेक्षकांच्या साक्षीने यंदाचे ऑलिम्पिक चाहत्यांसाठी नक्कीच अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,’’ असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सांगितले.