भारतीय संघाची तिरंगी स्पर्धेत चांगली कामगिरी झाली नसली तरी ते विश्वचषकाच्या बाद फेरीत सहज पोहोचतील. कारण विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतापुढे ऑस्ट्रेलियासारखा भेदक मारा नसेल. साखळी फेरीत काही संघ तुल्यबळ असून काही संघ कमजोर आहेत, त्यामुळे भारतीय संघाला साखळी फेरीतून बाद फेरीत सहजपणे जाता येईल. पण बाद फेरीत संघाचे मनोबल आणि मानसीकता कशी असेल, यावर त्यांच्या यशापयशाचे गणित ठरेल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने व्यक्त केले. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही विश्वचषकाबाबत आपली मते या वेळी कॅस्ट्रॉल अ‍ॅक्टिव्हच्या ‘क्लिंग ऑन टू दी कप’ या कार्यक्रमामध्ये व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियातील विश्वचषकामध्ये फिरकीपटूंचीही मोलाची भूमिका असेल, कारण ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे खेळपट्टय़ा या फिरकीला पोषक ठरतील. अ‍ॅडलेड आणि मेलबर्नच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली संधी असेल, पण फिरकीपटूंनी अधिक आक्रमक राहायला हवे. फिरकीपटूंनी जर बचावात्मक पवित्रा घेतला तर त्यांना जास्त यश मिळणार नाही, असे म्हणाला.
भारतीय संघातील एक फिरकीपटू निवडायला असेल तर कोणता निवडशील, असे विचारल्यावर कुंबळेने आर. अश्विनची पाठराखण केली. अश्विनकडे चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरसारखी आठव्या क्रमांकावर येऊन फलंदाजीही करू शकतो. पण त्याला आत्मविश्वास देण्याची गरज आहे. त्यामुळे पहिली पसंती ही अश्विनलाच असेल.