दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला खऱ्या अर्थाने बुधवारी सुरुवात झाली. धर्मशाळेच्या मैदानावरली पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने मोहाली येखील दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारत सध्या आपल्या संघबांधणीच्या प्रयत्नात आहे. याच कारणासाठी आफ्रिकेविरुद्ध मालिकेत नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. तो सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता.

“गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. खेळपट्टी चांगली होती आणि आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरुवातही आश्वासक केली होती. मात्र मोक्याच्या क्षणी आमच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. सध्याच्या घडीला दबावाखाली चांगली कामगिरी कोण करु शकेल अशाच खेळाडूंचा आम्ही शोध घेत आहोत. आगामी सामन्यांमध्येही अशाच प्रकारे अधिकाधीक नवीन खेळाडूंना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.” कर्णधार विराट आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलत होता.

अवश्य वाचा – Video : मोहालीच्या मैदानावर विराट कोहलीचा रुद्रावतार

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून १५० धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने विजयी लक्ष्याच्या दिशेने यशस्वी आगेकूच केली.

शिखर धवन ४० धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – आफ्रिदीला मागे टाकत विराटची दुसऱ्या स्थानावर मुसंडी, आफ्रिदीनेही केलं कौतुक