आपल्या देशात उपलब्ध असलेल्या नैपुण्यातून आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत येथील लष्करी क्रीडा संस्था (आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ुट-एएसआय) खेळाडू किमान दहा पदके मिळवतील, असा आत्मविश्वास या संस्थेचे संचालक कर्नल पी.एस.चीमा यांनी येथे सांगितले.
या संस्थेची पुण्यात २००१ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर या संस्थेद्वारे मिशन ऑलिम्पिक योजनेंतर्गत ऑलिम्पिक क्रीडापटू घडविण्याचा उपक्रम सेनादल व भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी सुरू केला आहे, असे सांगून चीमा म्हणाले, देशात अकरा क्रीडा प्रकारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पुण्यात तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, डायव्हिंग, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग व कुस्ती या सात खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत आमच्या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंपैकी दोन खेळाडूंनी अथेन्स ऑलिम्पिक २००४ मध्ये , सहा खेळाडूंनी २००८ च्या बीिजग ऑलिम्पिकमध्ये तर आठ खेळाडूंनी लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये आमच्या संस्थेचे १० ते १५ खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील व त्यापैकी किमान दहा खेळाडूंना पदक मिळेल, असे प्रशिक्षण आम्ही देत आहोत.
या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ५७२ पदके मिळविली असून राष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडूंनी २६३१ पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये तरुणदीप रॉय, सी.एच.जिग्नेश (तिरंदाजी), संदीपकुमार (तलवारबाजी), छोटेलाल यादव (बॉक्सिंग) आदी प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. सध्या येथे पाचशे खेळाडू विविध क्रीडा प्रकारात प्रशिक्षण घेत आहेत. परदेशी प्रशिक्षकांसह ३४ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव सुरू आहे. तिरंदाजांकरिता मैदानात प्रशिक्षण दिले जात आहे, त्याचबरोबर इनडोअर सभागृहातही ते तिरंदाजीचा सराव करीत आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून १० ते १६ वर्षांखालील मुलांची या योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी निवड केली जाते. त्यांच्याकडे असलेले क्रीडा नैपुण्य पाहून ते कोणत्या खेळासाठी योग्य आहेत हे पाहूनच त्यांची निवड केली जाते. सुरुवातीला बॉईज स्पोर्ट्स कंपनीत त्यांची निवड केली जाते. ही मुले साडेसतरा वर्षांची झाल्यानंतर त्यांना लष्करात त्यांच्या क्षमतेनुसार व त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशानुसार विविध पदांवर नियुक्त केले जाते. या खेळाडूंना फिजिओ, मसाजिस्ट, आहारतज्ज्ञ, बायोमेडिकल तज्ज्ञ, फिजिकल ट्रेनर, परदेशी प्रशिक्षक आदी सर्व सुविधा दिल्या जातात. प्रत्येक खेळाडूच्या प्रगतीचा दर आठवडय़ाला अभ्यास करीत त्यानुसार त्याला सूचना दिल्या जातात व त्याप्रमाणे सुधारणा होत आहे याची काळजी घेतली जाते, असेही चीमा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धासाठी निवड झालेल्या सेनादलाच्या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर येथे आयोजित केले जाते. येथील विविध सुविधांसाठी पन्नास कोटी रुपये खर्च आला आहे. खेळाडूंचे प्रशिक्षण, साधने याकरिता दरवर्षी आठ ते दहा कोटी रुपये खर्च येत आहे. त्यापैकी निम्मा खर्च परदेशी प्रशिक्षकांकरिता होत असतो असेही चीमा यांनी सांगितले.