माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटला विश्वास

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीपाठोपाठ बॅडमिंटनपटूंकडून भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. त्यात माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटचाही समावेश आहे.  ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सर्वाधिक पदके पटकावतील, असा विश्वास अपर्णाने व्यक्त केला. या स्पर्धेत किदम्बी श्रीकांत, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू असे एकेरीतील अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत, परंतु या वेळी दुहेरीतील खेळाडूही पदकाची लयलूट करतील, असेही ती म्हणाली.

‘‘पुरुष व महिला एकेरी, मिश्र दुहेरी व पुरुष दुहेरीत पदकांची अपेक्षा आहे. त्यामध्ये ही पुरुष एकेरी गटात सर्वाधिक आशा आहेत. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत श्रीकांत व एच. एस. प्रणॉय हे अनुक्रमे दुसऱ्या व बाराव्या स्थानी आहेत. त्यांच्यासमोर खडतर आव्हान निर्माण करणारा मलेशियाचा लि चाँग वेई सध्या त्याच्या फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे पुरुष एकेरीत पदक पटकावण्यात आपल्याला अडथळा येण्याचे चिन्ह कमीच आहेत. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्विक साईराज मागील सहा महिन्यांपासून अप्रतिम खेळ करत आहेत व त्यांच्याकडून पदक येणे अपेक्षित आहे,’’ असे ती म्हणाली.

‘‘सिंधू व नेहवाल यांच्याकडून देशाला नेहमीच पदकाची अपेक्षा असते. कित्येक वेळा या दोघींमधून कोण सुवर्ण पदक जिंकणार यावर अधिक चर्चा रंगलेली आपणास पाहायला मिळते. कॅनडाच्या मिशेल लि व स्कॉटलंडच्या किस्र्टी गिल्मोर यांच्यापासून मात्र आपल्याला धोका उद्भवू शकतो. विशेषत: मिशेल लिने मागील राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूला उपांत्य फेरीत हरवले होते व पुढे सुवर्ण पदकदेखील मिळवले. याचप्रमाणे महिलांच्या दुहेरी गटात अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी या चांगला खेळ करत आहेत,’’ असे तिने सांगितले.