भारताने १९-वर्षांखालील (युवा) तिरंगी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडवर मात करत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार रिषभ पंत आणि हिमांशू राणा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २६१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २४१ धावांवर आटोपला आणि भारताने २० धावांनी विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रिषभ आणि हिमांशी यांनी ११३ धावांची सलामी देत संघाला दमदार सुरुवात करून दिली. रिषभने यावेळी नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, त्याला हिमांशूने चार चौकारांच्या जोरावर ५० धावा करत सुयोग्य साथ दिली.
भारताच्या २६२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला डॅन लॉरेन्सने ९ चौकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारत चांगली सुरुवात करून दिली. पण डॅन बाद झाल्यावर जॉर्ज बार्टलेटने ८ चौकारांच्या जोरावर ७० धावा करत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण तो बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव २४१ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत सर्व बाद २६१ (रिषभ पंत ७१, हिामांशू राणा ५०; मॅसन क्रेन ३/५१) विजयी वि. इंग्लंड : ४९.३ षटकांत
सर्व बाद २४१ (जॉर्ज बार्टलेट ७०, डॅन लॉरेन्स ५५; राहुल बाथम ३/२४).