जर्मनीमध्ये सुरु असलेल्या ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजपटूंनी सुरेख कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारतीय नेमबाजपटूंनी ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य अशा ११ पदकांची कमाई केली आहे.

पुरुषांच्या ५० मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या गौरव राणा आणि अर्जुन सिंह चिमाने अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली. दोन्ही खेळाडूंनी सांघिक प्रकारात विजयवीर सिद्धूच्या मदतीने सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिक स्पर्धेत भारतीय संघ आणि रौप्यपदक विजेत्या संघामध्ये तब्बल ४१ गुणांचा फरक होता.

विजयवीर सिद्धुचं या स्पर्धेतलं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. पहिल्या दिवशी विजयवीरने २५ मी. पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. महिलांच्या ५० मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या प्रिया राघव आणि विभुती भाटीया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. प्रिया आणि विभुती यांनी आपली सहकारी हर्षदा निथावेच्या साथीने सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. रशियान महिलांनी या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं.