अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले. शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.

पाकिस्तानकडून बदर मुनीर याने सर्वाधिक ५७ तर रियासत खान ४८ आणि कर्णधार निसार अली याने ४७ धावांचे योगदान दिले. याच्या जोरावर पाकिस्तानने ३०८ धावांची मजल मारली. भारताने ३८.२ षटकात आठ गडी गमावून हे आव्हान पार केले. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली.  भारतीय संघ विजयाच्या समीप असताना पाकिस्तानने भारताचे तीन गडी लागोपाठ बाद केले. त्यामुळे या सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, ३८व्या षटकातील दुसरा चेंडू वाईड बॉल सीमापार गेला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. मात्र, भारताने आज या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा १५६ धावांनी पराभव केला होता. तर भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशला सात गडी राखून हरवले होते. त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. अखेर भारताने हा सामना जिंकत क्रीडा रसिकांच्या आशा सार्थ ठरवल्या.