भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय; लोकेश राहुलचे अर्धशतक

श्रीलंकेच्या महत्वाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत युजवेंद्र चहलने भारताला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. लोकेश राहुलचे अर्धशतक, महेंद्रसिंग धोनी आणि मनीष पांडे यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाला चहल आणि अन्य गोलंदाजांचा समर्थपणे सामना करता न आल्याने त्यांचा ८७ धावांतच खुर्दा उडाला. सामनावीर चहलने यावेळी चार बळी मिळवले, तर धोनीने उपयुक्त खेळीबरोबरच प्रत्येकी दोन झेल आणि यष्टीचीत असे एकूण चार फलंदाजांना माघारी धाडण्यात महत्वाची भूमिका बजावली.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर लोकेश राहुलने सुरुवातीपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. कसोटी आणि एकदिवसीय संघातील स्थानासाठी झुंजणाऱ्या राहुलने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४८ चेंडूंत ६१ धावांची खेळी साकारली.

थिसारा परेराने त्याला त्रिफळाचीत केल्यावर भारताच्या धावांचा आलेख धोनी आणि पांडे यांनी उंचावला. सुरुवातीला संयतपणे खेळणाऱ्या धोनीने डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला १८० धावांचा पल्ला गाठून दिला. धोनी आणि पांडे या जोडीने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. धोनीने २२ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३९ आणि पांडेने १८ चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ३२ धावांची खेळी साकारली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. त्यानंतर ठराविक फरकाने अन्य फलंदाजांनी तंबूचा रस्ता धरण्यातच धन्यता मानली. चहलने यावेळी फॉर्मात असलेला उपुल थरंगा, अनुभवी अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने आणि कर्णधार थिसारा परेरा या महत्वाच्या फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने तीन आणि कुलदीप यादवने दोन बळी मिळवत चहलला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : २० षटकांत ३ बाद १८० (लोकेश राहुल ६१, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३९, मनीष पांडे नाबाद ३२, श्रेयस अय्यर २४; अँजेलो मॅथ्यूज १/१९) विजयी वि. श्रीलंका : १६ षटकांत सर्व बाद ८७ (उपुल थरंगा २३; युजवेंद्र चहल ४/२३, हार्दिक पंडय़ा ३/२९, कुदलीप यादव २/१८).
  • सामनावीर : युजवेंद्र चहल.