भारत-इंग्लंड महिला संघांमधील पहिला एकदिवसीय सामना आज; हरमनप्रीतची दुखापतीमुळे माघार
मुंबई : अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौरने दुखापतीमुळे माघार घेतली असली तरी संघातील युवा खेळाडू तिची कमतरता जाणवू देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तिचे हे शब्द किती सार्थ ठरतात, याचा प्रत्यय शुक्रवारी सर्वाना येईलच. भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला जाणार असून न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या एकदिवसीय मलिकेतील विजयाची परंपरा कायम राखण्याच्या निर्धारानेच भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वीच हरमनप्रीतने माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे गुरुवारी हरमनप्रीत सरावालादेखील आली नाही. तिच्याऐवजी हरलीन देओल या युवा खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून मितालीला वगळण्याचा निर्णय भारताला महागात पडला होता. ३-० अशा फरकाने ट्वेन्टी-२० मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत मात्र मितालीच्याच नेतृत्वाखाली २-१ असे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे ‘आयसीसी’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेतील या मालिकेत मितालीच्या कर्णधारपदाखाली नव्या उमेदीने खेळण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत.
मितालीव्यतिरिक्त कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत असलेली स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर संघाची मदार असेल. अनुभवी झुलन गोस्वामी गोलंदाजीत आक्रमणाची धुरा सांभाळेल. तिला पूनम यादव, दीप्ती शर्मा व एकता बिश्त या फिरकी त्रिकुटाची साथ लाभेल.
संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), आर. कल्पना (यष्टिरक्षक), मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम राऊत, हरलीन देओल.
इंग्लंड : हिदर नाइट (कर्णधार), सारा टेलर (यष्टिरक्षक), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया डंकली, सोफी एकेलस्टोन, जॉर्जिया एल्विस, अॅलेक्स हार्टले, अॅमी जोन्स, लॉरा मार्श, नॅट स्किव्हर, अन्या श्रुबसोल, लॉरेन विनफिल्ड, डॅनिएल व्हॅट.
२०२१च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही खेळणार आहोत. विश्वविजेत्या संघाविरुद्ध खेळताना एखाद्या खेळाडूला झालेली दुखापत दुसऱ्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याविषयी अद्याप काहीही विचार केला नसून योग्य वेळ आल्यास मी स्वत:हून याविषयी सांगेन.
– मिताली राज, भारतीय कर्णधार
भारतात मालिका जिंकणे, हे कोणत्याही संघाचे स्वप्न असते. २०१८मध्ये संघातील बहुतांश खेळाडू युवा असल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र गेल्या काही महिन्यांत आमच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.
– हिदर नाइट, इंग्लंडची कर्णधार
’ सामन्याची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2019 12:38 am