29 September 2020

News Flash

भारतीय महिला संघ मालिकेतील दुहेरी यशासाठी उत्सुक

भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने आधीच जिंकली आहे

| February 24, 2018 05:23 am

(संग्रहित छायाचित्र)

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा ट्वेन्टी-२० सामना

भारतीय महिला संघाच्या खात्यावर ट्वेन्टी-२० मालिकेतील २-१ अशी आघाडी जमा आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील दुहेरी यश त्यांना खुणावते आहे. शनिवारी होणारा पाचवा आणि अखेरचा ट्वेन्टी-२० सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने आधीच जिंकली आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय ट्वेन्टी-२० संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. सेंच्युरियन येथील चौथा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याची विजयी सांगता करण्याचे लक्ष्य भारताने समोर ठेवले आहे.

पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवताना अनुक्रमे सात आणि नऊ विकेट राखून विजय मिळवले होते. परंतु तिसऱ्या सामन्यात पाच विकेट्ने पराभव पत्करल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे मालिकेतील आव्हान जिवंत राहिले आहे. चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १५.३ षटकांत ३ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु पावसाने हा सामना पूर्ण होऊ दिला नाही.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेच्या एका दौऱ्यावर दोन मालिका जिंकण्याचा इतिहास ते घडवतील. ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर हे ऐतिहासिक यश असेल. भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजने पहिल्या दोन सामन्यांत सलग (५४, ७६) अर्धशतके झळकावली आहेत, मात्र तिसऱ्या सामन्यात तिला शून्यावर बाद व्हावे लागले होते. सलामीवीर स्मृती मानधनासुद्धा फलंदाजीत सातत्य दाखवत आहे. तिने २८, ५७, ३७ असे आपले योगदान दिले आहे. तिसऱ्या सामन्यात फक्त हरमनप्रीतने झुंजार फलंदाजीचा प्रत्यय घडवताना ३० चेंडूंत ४८ धावा केल्या होत्या. मात्र भारताचा डाव १७.५ षटकांत १३३ धावांत आटोपला होता. वेदा कृष्णमूर्तीने मिळालेल्या दोन संधींचे सोने करताना ३७ आणि २३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ऑफ-स्पिनर अनुजा पाटीलवर भारताचे प्रमुख मदार असेल. तिच्या खात्यावर एकूण पाच बळी जमा आहेत. तिसऱ्या सामन्यात ती महागडी ठरली होती. फिरकीपटू पूनम यादव आणि वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी चार बळी आतापर्यंत घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डॅन व्हॅन नीकर्क आणि वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइल यांच्यावर प्रमुख भिस्त असेल. सलामीवीर लिझेले लीसुद्धा फॉर्मात आहे.

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिका रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया, नुझहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकार, राधा यादव, रुमेली धर.

दक्षिण आफ्रिका : डॅन व्हॅन नीकर्क (कर्णधार), मरिझाने कॅप, तृषा छेट्टी, शबनिम इस्माइल, अयाबोंगा खाका, मसाबाता क्लास, सुनी लूस, ऑडिने किर्स्टन, मिगनॉन डय़ू प्रीझ, लिझेले ली, श्लोई ट्रायऑन, नॅडिने डी क्लर्क, रेसिबे नोझाखी, मोसेलाइन डॅनियल्स.

सामन्याची वेळ : दुपारी ४.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 5:23 am

Web Title: india women eye a rare double series win against south africa
Next Stories
1 हजारे चषक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची कर्नाटकविरुद्ध कसोटी
2 दिवस-रात्र कसोटीवरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीमध्ये वाद
3 ट्वेन्टी-२०शिवाय क्रिकेट टिकणे कठीण -गांगुली
Just Now!
X