भारतीय महिला संघाला हॉकेज बे चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत लागोपाठ तिसरा पराभव पत्करावा लागला. चुरशीच्या लढतीत त्यांना चीन संघाने २-१ असे हरवले.
साखळी ‘ब’ गटातील लढतीत राणीने १९व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. मात्र तिसऱ्या डावात चीनच्या युई कियानने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. शेवटच्या डावात चीनच्या वाँग मेंगयूने गोल केला व संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.
हा सामना अतिशय रंगतदार झाला. पहिल्या डावात चीनच्या खेळाडूंनी अनेक चाली केल्या, मात्र भारताची गोलरक्षक सविता कुमारीने अप्रतिम बचाव करीत या चाली रोखण्यात यश मिळवले. दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी जोरदार चाली केल्या. अखेर १९व्या मिनिटाला राणीने संघाचा गोल केला. लगेचच चीनला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र सविता कुमारीने चीनला गोलपासून वंचित ठेवले. उत्तरार्धात चीनच्या खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. त्यामध्ये त्यांना यश मिळाले. कियान हिने गोल करीत चीनची लढत कायम ठेवली. शेवटच्या डावात भारताच्या दीपिका कुमारी हिने दोन-तीन चांगल्या चाली केल्या, मात्र तिने मारलेले फटके गोलपोस्टबाहेर गेले. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत मेंगयू हिने गोल केला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांच्या चाली असफल ठरल्या.
‘‘चीन हा आमच्यापेक्षा बलाढय़ संघ आहे. हे लक्षात घेता आमच्या खेळाडूंनी कौतुकास्पद खेळ केला. शेवटच्या सात मिनिटांमध्ये केलेल्या अक्षम्य चुकांमुळेच हा सामना गमवावा लागला,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी सांगितले.
भारताला यापूर्वी न्यूझीलंड व आर्यलड यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. भारताची उपांत्यपूर्व फेरीत जपानबरोबर गाठ पडणार आहे. हा सामना ७ एप्रिल रोजी होईल.