आज इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना

गुवाहाटी : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवून सलग पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला हेाता.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी डब्ल्यू. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ तयारी करीत आहे. मात्र सलग पाचव्या पराभवामुळे या तयारीचे विश्लेषण केले जात आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर सर्व ट्वेन्टी-२० सामने भारताने गमावले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.

सलामीच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६० धावा अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. त्यानंतर भारताचा डाव फक्त ६ बाद ११९ धावांवर सीमित राहिला. इंग्लंडच्या धावसंख्येचे आव्हान पेलण्याची प्रमुख जबाबदारी भारताच्या आघाडीच्या फळीवर होती. परंतु हर्लिन देओल, प्रभारी कर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि अनुभवी मिताली राज अपेक्षांचे पूर्तता करण्यात अपयशी ठरले. नियमित कर्णधार आणि फटकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौरची उणीव भारताला तीव्रतेने भासली. दुखापतीमुळे तिने या मालिकेतून माघार घेतली आहे.

सातत्याने धावा करणाऱ्या आणि आयसीसीचा वर्षांतील सर्वर्ोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्मृतीने इंग्लंडविरुद्ध प्रथमच नेतृत्व केले. परंतु ती फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही पातळीवर अपयशी ठरली.

३६ वर्षीय मिताली पहिल्या सामन्यात फक्त ७ धावाच काढू शकली. विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेआधी निवृत्ती पत्करण्याची शक्यता असलेल्या मितालीच्या उर्वरित दोन सामन्यांतील कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.

भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वेदा कृष्णामूर्तीने १५ धावा केल्या, परंतु त्यासाठी २५ चेंडू तिला झगडावे लागले. त्या तुलनेत शिखा पांडे (नाबाद २३), दीप्ती शर्मा (नाबाद २२) आणि अरुंधती रेड्डी (१८) यांनी अधिक आत्मविश्वासाने फलंदाजी केली. गोलंदाजीत दीप्ती, अरुंधती आणि राधा यादव महागडय़ा ठरल्या. मध्यमगती गोलंदाज शिखा (१/१८) आणि पूनम यादव (०/१८) यांनी उत्तम सरासरी राखली.

इंग्लंडकडून टॅमी ब्युमाँट , कर्णधार हीदर नाइट व डॅनियल व्ॉट यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. त्यांना गोलंदाजांची साथ मिळाल्यामुळे इंग्लंडला विजय साकारता आला.

संघ

’ भारत : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झांझड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल.

’ इंग्लंड : हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया ब्राऊन, जॉर्जिया एल्व्हिस, अ‍ॅमी जोन्स, फ्रेया डेव्हिस, नताली शिव्हर, लॉरा मार्श, अन्या श्रुबसोल, लिन्से स्मिथ, लॉरेन विनफिल्ड, डॅनिएल व्ॉट, अ‍ॅलेक्स हार्टले.

’ सामन्याची वेळ : सकाळी ११ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १