मिताली व स्मृती यांची अर्धशतके; मालिकेत २-० अशी आघाडी

मिताली राज व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी केली. त्यामुळेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना नऊ विकेट राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १४२ धावा केल्या. त्यामध्ये सून लूस (३३) व नेदिनी डी क्लर्क (२६) या दोनच खेळाडू फलंदाजीत चमक दाखवू शकल्या. भारताकडून अनुजा पाटील व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

मिताली व स्मृती यांनी सलामीसाठी १०६ धावांची खणखणीत भागीदारी करीत भारताचा विजय दृष्टिपथात आणला. मितालीने त्यानंतर कर्णधार हरमानप्रीत कौरच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखून धरले. लूस व क्लर्क यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या ४३ धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता आफ्रिकेकडून अन्य मोठी भागीदारी झाली नाही. पाटील व यादव यांना पूजा वस्त्रकार व शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करीत चांगली साथ दिली.

मिताली व स्मृती यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत भारताच्या विजयाचा पाया रचला. स्मृतीने चार चौकार व तीन षटकारांसह ५७ धावा केल्या. मोसेलीन डॅनियलने तिला बाद करीत ही जोडी फोडली. मितालीने ६१ चेंडूंत नाबाद ७६ धावा करताना आठ चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ७ बाद १४२ (सून लूस ३३, नेदिनी डी क्लर्क २६; अनुजा पाटील २/३७, पूनम यादव २/१८) पराभूत वि. भारत : १९.१ षटकांत १ बाद १४४ (मिताली राज नाबाद ७६, स्मृती मानधना ५७)