ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी एकदिवसीय लढत आज

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ गुरुवारी ऑस्ट्रेलिया महिला संघाला चोख उत्तर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मालिकेतील आव्हान वाचवण्यासाठी भारतीय महिलांना दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. अनुभवी खेळाडू मिताली राजचे पुनरागमन झाल्यास भारताचे मनोबल नक्की उंचावेल.

ताप आल्यामुळे मितालीला पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते आणि त्यामुळे मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जला एकदिवसीय लढतीत पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याचा फायदा उचलण्यात जेमिमा अपयशी ठरली. त्यामुळे दुसऱ्या लढतीत तिला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर सुषमा वर्मा आणि पूजा वस्त्रकार यांनी पहिल्या लढतीत भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला होता. मात्र, मितालीच्या आगमनाने भारताची फलंदाजीची बाजू भक्कम होईल. भारतीय गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि ती संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींवर प्रभुत्व गाजवले आहे. निकोल बोल्टन व एलिसा हिली यांनी भारतीय गोलंदांचा मारा निष्प्रभ केला होता आणि याही लढतीत त्यांच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार मेग लॅनिंगची बॅट धावांचा पाऊस पाडण्यासाठी आसुसलेली आहे. गोलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ आहे.

तळाच्या फलंदाजांकडून आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. आमच्या वरिष्ठ फलंदाजांनी चांगली खेळी करायला हवी. क्षेत्ररक्षणात काही अंशी सुधारणा होणे गरजेचे आहे आणि त्यानुसार गोलंदाजी करायला हवी.   – हरमनप्रीत कौर, भारताची बदली कर्णधार

मालिकेतील सुरुवात सकारात्मक झाली. पुन्हा मैदानावर परतल्याचा आनंद आहे. आम्ही आक्रमक फलंदाजी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याचे नेतृत्व निकोल बोल्टन करेल.  – मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कर्णधार