इंग्लंडविरुद्ध आज अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना

विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध मालिका भारताने आधीच खिशात घातली आहे. आता गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा निर्धार भारतीय महिला संघाने केला आहे.

नवे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने इंग्लंडसारख्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध दोन सामन्यांत दमदार कामगिरी केली आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या विजयांसह २०२१मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत थेट पात्रतेच्या दृष्टीने आयसीसी महिला अजिंक्यपदाचे चार महत्त्वाचे गुण भारताच्या खात्यात जमा झाले आहेत. आता आणखी दोन गुणांची भर पडण्याची संधी असल्यामुळे यजमान संघ फारसे बदल करण्याची चिन्हे नाहीत.

‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणारी सलामीवीर स्मृती मानधना सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करीत आहे. दुसऱ्या सामन्यात ६३ धावा काढणारी स्मृती मालिकावीर पुरस्कारासाठी दावेदार ठरू शकते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खात्यावर असणारी अनुभवी कर्णधार मिताली राजने मागील दोन सामन्यांत अनुक्रमे ४४ आणि ४७ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात हर्लिन देओलऐवजी संधी मिळालेल्या अनुभवी पूनम राऊतने दमदार पुनरागमन करताना ३२ धावा केल्या आहेत. पूनमच्या समावेशामुळे मधल्या फळीची ताकद वाढली आहे. युवा सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूनम या दोन्ही मुंबईकर खेळाडूंनी उत्तम सुरुवातीचे रूपांतर मोठय़ा खेळीमध्ये करण्याची आवश्यकता आहे. आघाडीची फळी कोसळल्यास दीप्ती शर्मा, मोना मेश्राम आणि यष्टीरक्षक तानिया भाटिया या मधल्या फळीतील खेळाडूंनी अधिक जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे.

पहिल्या सामन्यात दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि एकता बिश्त या भारताच्या फिरकी त्रिकुटाने इंग्लिश फलंदाजांना झगडायला लावले आहे, तर अनुभवी झुलन गोस्वामी (एकूण ५ बळी), शिखा पांडे (एकूण ६ बळी) या वेगवान गोलंदाजांनी दोन्ही सामन्यांत छाप पाडली.

अष्टपैलू सोफी इक्लेस्टनने तिसऱ्या सामन्यातून माघार घेतल्यामुळे इंग्लंड संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. त्यामुळे अखेरची लढत जिंकून प्रतिष्ठा जपण्याचा आणि आयसीसी अजिंक्यपदासाठी दोन गुण मिळवण्याचे ध्येय इंग्लंड संघापुढे असेल. अष्टपैलू नताली शिव्हर आणि कर्णधार हिदर नाइट वगळल्यास इंग्लंड संघातील अन्य खेळाडूंची कामगिरी ही निराशाजनक ठरली आहे. वेगवान गोलंदाज अन्या श्रुबसोल, जॉर्जिया एल्व्हिस आणि कॅथरिन ब्रंट यांच्यावर इंग्लंडच्या गोलंदाजीची मदार असेल.

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात केलेल्या कामगिरीत सातत्य राखण्याचाच आमचा प्रयत्न राहिल. कारकीर्द निवृत्तीकडे झुकत असतानादेखील संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत असल्यामुळे मी समाधानी आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, याविषयी बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे.    – झुलन गोस्वामी, भारतीय गोलंदाज

संघ

  • भारत: मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), आर. कल्पना, मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम राऊत, हर्लीन देवोल.
  • इंग्लंड: हिदर नाइट (कर्णधार), सारा टेलर (यष्टीरक्षक), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया डंकली, सोफी एकेलस्टोन, जॉर्जिया एल्विस, अ‍ॅलेक्स हार्टले, अ‍ॅमी जोन्स, लॉरा मार्श, नॅट स्किव्हर, अन्या श्रुबसोल, लॉरेन विनफिल्ड, डॅनिएल वॅट.
  • सामन्याची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १