News Flash

पाचव्या वनडेतही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1ने मालिकाविजय

बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात पाचवा एकदिवसीय सामना खेळला गेला. यात आफ्रिका संघाने भारतला 5 गड्यांनी धूळ चारली. या विजयासह आफ्रिकाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकली आहे. बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताच्या 189 धावांच्या माफक आव्हाना पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. 30 धावांच्या आत भारताने आफ्रिकेच्या लोरा वॉलवॉर्ट(0), लारा गुडऑल(1) आणि कर्णधार सुने लूस(10) यांना बाद करत रंगत निर्माण केली. यानंतर डु प्रेज आणि एने बोश यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी रचली. बोशने 8 चौकारांसह 58 तर, डु प्रेजने 4 चौकारांसह 57 धावा केल्या. ही जोडी तुटल्यानंतर मरिजाने काप आणि क्लर्कने संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर, हेमलता आणि सी. प्रत्युषा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारताचा डाव

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. संघाची कर्णधार मिताली राजच्या नाबाद 79 धावांमुळे भारताला आफ्रिकेसमोर माफक आव्हान ठेवता आले. नाणेफेक जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रिया पुनिया आणि स्मृती मानधना यांनी डावाची सुरुवात केली. कापने प्रिया पुनियाची (18) दांडी गुल करत आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. मालिकेत दमदार फॉर्मात खेळणारी पुनम राऊत या सामन्यात अपयशी ठरली. तिला 10 धावांवर नोंडुमिसो शांगसेने बाद केले. सलामीवीर स्मृती मानधनाही 18 धावांवर तंबूत परतली. त्यानंतर मिताली राज आणि हरमनप्रीतने संघाची धावगती वाढवली. मात्र, काही कालावधीनंतर दुखापतीमुळे हरमनप्रीतने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिने 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या.

मितालीचा वन वुमन शो

या पडझडीनंतर मितालीने एक बाजू लावून धरली. तिच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांचा चांगली कामगिरी करता आली नाही. मितालीने 104 चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 79 धावा फटकावल्या. भारताच्या डावात मोनिका पटेलने 9, झुलन गोस्वामीने 5, दयालन हेमलताने 2 आणि सी प्रत्युषाने 2 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नादिन डी क्लर्कने 3, शांगसेने 2, तूमी सेखुखुनेने 2 आणि कापने 1 गडी बाद केला.

आता टी-20 मालिकेचे आव्हान

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताने फक्त दुसऱ्या लढतीत 9 गडी राखून विजय मिळवला. परंतु अन्य चार सामन्यांत आफ्रिकेने सहज विजय मिळवला. आता उभय संघात २० मार्चपासून टी२० मालिका रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 1:22 pm

Web Title: india women vs south africa women fifth odi match analysis adn 96
टॅग : Bcci,Cricket
Next Stories
1 ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना करोनाची लागण!
2 बिली जीन किंग कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
3 टी-20 मालिका : इंग्लंडविरुद्धचा पराभव ‘या’ तीन कारणांमुळे!
Just Now!
X