सुरत : किशोरवयीन सलामीवीर शेफाली वर्माची फटकेबाजी तसेच पूनम यादव, राधा यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकी त्रिकुटाने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने चौथ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५१ धावांनी धूळ चारली.

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १७ षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताच्या १४१ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ७ बाद ८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पूनमने तीन, राधाने दोन आणि दीप्तीने एक बळी मिळवून भारतासाठी मोलाचे योगदान दिले.

त्यापूर्वी पदार्पणाच्या सामन्यात भोपळा फोडण्यातही अपयशी ठरलेल्या शेफालीने या लढतीत ३३ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ४६ धावा फटकावल्या. तिला जेमिमा रॉड्रिग्जने (३३) उत्तम साथ दिल्यामुळे भारताने १७ षटकांत ४ बाद १४० धावा केल्या. मालिकेतील पाचवा सामना शुक्रवारी रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत : १७ षटकांत ४ बाद १४० (शेफाली वर्मा ४६, जेमिमा रॉड्रिग्ज ३३; निकोल डीक्लर्क २/२४) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : १७ षटकांत ७ बाद ८९ (लॉरा वॉल्वरडॅट २३; पूनम यादव ३/१३, राधा यादव २/१६) ’

सामनावीर : पूनम यादव