दक्षिण आफ्रिकेची सहा गडी राखून मात; मालिकेत विजयी आघाडी

लखनौ : दोन चेंडूत सहा धावांची आवश्यकता असताना वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने टाकलेल्या नो-बॉलमुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. आफ्रिकेने भारताचे आव्हान सहा गडी राखून पार करत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताचे १५९ धावांचे आव्हान पार करताना सलामीवीर लिझेली ली आणि लॉरा वोल्वार्ट यांनी दमदार अर्धशतके साजरी केली. लिझेलीने ७० धावा फटकावत विजयात योगदान दिले. अखेरच्या क्षणी लॉराने नाबाद ५३ धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. आफ्रिकेचा हा भारतावरील पहिला ट्वेन्टी-२० मालिकाविजय ठरला.

तत्पूर्वी, सलामीवीर शफाली वर्मा आणि रिचा घोष यांच्या अप्रतिम योगदानामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला २० षटकांत ४ बाद १५८ धावा करता आल्या. शफाली आणि हरलिन देवल यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी रचत भारताच्या डावाची भक्कम पायाभरणी केली.

वेगवान गोलंदाज नोनकुलुलेको मलबा हिने शफालीला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. शफालीने सहा चौकार आणि दोन षटकारासह ४७ धावा फटकावल्या. त्यानंतर रिचा घोष हिने २६ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी करत भारताला दीडशे धावांचा पल्ला ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला : २० षटकांत ४ बाद १५८ (शफाली वर्मा ४७, रिचा घोष ४४, हरलिन देवल ३१; अनेके बॉश १/२६) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका महिला : २० षटकांत ४ बाद १५९ (लिझेली ली ७०, लॉरा वोल्वार्ट नाबाद ५३; राजेश्वरी गायकवाड १/२०).