सुरत : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील दोन सामने पावसामुळे वाया गेल्यानंतर मंगळवारी रंगणाऱ्या चौथ्या सामन्यात यश संपादन करून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे.

सुरत येथील लालाभाई कॉण्ट्रॅक्टर स्टेडियमवर सुरू असलेल्या या मालिकेतील दुसरा सामना भारताने ११ धावांनी जिंकला, तर पहिली व तिसरी लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यासाठीही भारताच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवणाऱ्या १५ वर्षीय शेफाली वर्माच्या कामगिरीकडे चाहत्यांचे प्रामुख्याने लक्ष आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी संघासाठी फलंदाजीत सातत्याने योगदान दिले असून गोलंदाजीत दीप्तीच्या साथीने पूनम यादव आणि राधा यादव यांचे त्रिकूट मोलाची कामगिरी करत आहे. त्याशिवाय स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावरही भारताची भिस्त आहे.

दुसरीकडे आफ्रिकेची मदार दुसऱ्या सामन्यातील अर्धशतकवीर मिग्नोन डूप्रीझ आणि गोलंदाज शबनिम इस्माइल यांच्यावर आहे. उभय संघातील पाचवा सामना गुरुवारी रंगणार आहे.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३