दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

सूरत : अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजच्या निवृत्तीनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी मैदानावर उतरणाऱ्या भारतीय महिला संघाची मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात नव्या दमाच्या खेळाडूंवरच सर्वाधिक भिस्त असणार आहे.

उभय संघात झालेल्या मागील पाच सामन्यांपैकी भारताने तीन, तर आफ्रिकेने एक सामना जिंकला असून एक लढत रद्द करण्यात आली आहे. परंतु या वेळी घरच्या मैदानाचा फायदा उचलून भारताला क्रमवारीतही आगेकूच करण्याची संधी आहे. नुकताच झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात आफ्रिकेने अध्यक्षीय एकादश संघाला ८३ धावांनी धूळ चारली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी गाफील राहून चालणार नाही.

भारताकडे सलामीवीरांच्या रूपात जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांची धडाकेबाज जोडी उपलब्ध असून मधल्या फळीत कर्णधार हरमनप्रीत कौरसह, तानिया भाटिया, प्रिया पुनिया, हर्लिन देओल यांच्यावर फलंदाजीची धुरा असणार आहे. गोलंदाजीत शिखा पांडेच्या नेतृत्वाखाली अनुजा पाटील, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांचे अनुभवी त्रिकूट कशी कामगिरी करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पूजा वस्त्रकर आणि शेफाली वर्मा या युवा खेळाडूंवरही सर्वाचे लक्ष आहे.

आफ्रिकेची मदार प्रामुख्याने कर्णधार सन लुस, शबनिम इस्मेल, अ‍ॅने बोस्च यांच्यावर आहे. सूरत येथील लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

* सामन्याची वेळ :  सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३