मालिकेत २-० अशी विजयी आघाडी; युवा तानियाचे सुरेख अर्धशतक

सुरुवातीच्या पडझडीनंतर यष्टिरक्षक तानिया भाटिया व कर्णधार मिताली राज यांनी केलेल्या अर्धशतकी खेळ्यांमुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर ७ धावांनी विजय मिळवला. भारताच्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४८.१ षटकांत २१२ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३६ धावांवर भारताने पूनम राऊत (३), स्मृती मानधना (१४) व हरमनप्रीत कौर (७) या तिघींना गमावले. दीप्ती शर्माही १२ धावा काढून बाद झाली. मात्र त्यानंतर कारकीर्दीतील दुसराच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या तानियाने जोरदार फटकेबाजी करताना अवघ्या ६६ चेंडूंत नऊ चौकारांसह ६८ धावा ठोकल्या. कर्णधार मितालीनेही तिला योग्य साथ देत १२१ चेंडूंमध्ये ५२ धावा करताना कारकीर्दीतील ५१व्या अर्धशतकाला गवसणी घातली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच भारताला २१९ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेतर्फे त्यांची कर्णधार चामरी अटापट्टू हिने सर्वाधिक तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात श्रीलंकेचीही सुरुवात निराशाजनक झाली. ४० धावांवर तीन फलंदाज गमावल्यामुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला. मात्र कर्णधार चामरी पुन्हा एकदा संघासाठी धावून आली. तिने ५७ धावांची खेळ साकारतानाच चौथ्या विकेटसाठी शशिका सिरीवर्दनेसह ८९ धावांची भागीदारी रचली. मात्र शिखा पांडेने चामरीला मानसी जोशीकरवी झेलबाद करत भारताचे सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर शिखानेच शशिकालाही (४९) धावबाद करत श्रीलंकेला आणखी अडचणीत टाकले. अखेरीस ४९व्या षटकात दीप्तीने इनोका रनवीराला यष्टिचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तानियाने क्षेत्ररक्षणातही कमाल करत दोन यष्टिचीत तसेच एक झेल घेत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत सर्वबाद २१९ (तानिया भाटिया ६८, मिताली राज ५२; चामरी अटापट्ट ३/४२) विजयी वि. श्रीलंका : ४८.१ षटकांत सर्वबाद २१२ (चामरी अटापट्टू ५७, शशिका सिरीवर्दने ४९; राजेश्वरी गायकवाड २/३७).