तिसऱ्या एकदिवसीयमध्ये ऑस्ट्रेलियावर मात
मिताली राजची अर्धशतकी खेळी
कर्णधार मिताली राजच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ विकेट्सनी विजय मिळवला. ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता, मात्र एकदिवसीय मालिकेतील दोन लढती जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेवर कब्जा केला. मात्र शेवटच्या लढतीत विजय मिळवत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला निर्भेळ विजय मिळवू दिला नाही.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावांची मजल मारली. अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने ६० तर एलियास पेरीने ५० धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने मिताली राजच्या खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठले. मितालीने १२ चौकारांसह ८९ धावांची खेळी साकारली. स्मृती मंधानाने ५५ धावा करत मितालीला चांगली साथ दिली. मितालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ७ बाद २३१ (अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल ६०, एलियास पेरी ५०, शिखा पांडे ३/५०) पराभूत विरुद्ध भारत : ४७ षटकांत ५ बाद २३४ (मिताली राज ८९, स्मृती मंधाना ५५, एलियास पेरी २/५०)