भारतीय क्रीडापटूंनी अपेक्षेनुरुप खेळ करत दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार प्रदर्शनासह १४ सुवर्णपदकांवर नाव कोरले. सलामीच्या दिवशी भारतीय संघाने एकूण १९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान राखले.
सायकलिंगमध्ये, महिलांच्या तीस किलोमीटर वैयक्तिक कौशल्य क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तिने ४९ मिनिटे २४.५७३ सेकंदात हे अंतर पार केले. तिची सहकारी एलांगबाम चाओबा देवी हिने रौप्यपदक मिळविले. पुरुषांच्या ४० किलोमीटर वैयक्तिक कौशल्य प्रकारात अरविंद पन्वर या भारतीय खेळाडूला विजेतेपद मिळाले. त्याने ही शर्यत ५२ मिनिटे २८.८ सेकंदात पार केली. त्याचा सहकारी मनजितसिंग याने रुपेरी कामगिरी करताना ५४ मिनिटे १.१८३ सेकंद वेळ नोंदविली.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन सुवर्ण
वेटलिफ्टिंगमधील पहिला दिवस भारतीय खेळाडूंनीच गाजविला. सैखोम मीराबाई चानूने ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकताना स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९० किलो असे एकूण १६९ किलो वजन उचलले. पुरुषांच्या ५६ किलो गटात भारताच्या गुरुराज याने सोनेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १०४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३७ किलो असे एकूण २४१ किलो वजन उचलले.
कुस्तीत भारताचा सुवर्णपंचकार
भारताने कुस्तीमधील पहिल्या दिवशी पाच सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांमध्ये रजनीश (६५ किलो) व रवींदरकुमार (५७ किलो) यांना विजेतेपद मिळाले. महिलांमध्ये प्रियंकासिंग (४८ किलो), मनीषा (६० किलो) व अर्चना तोमर (५५ किलो) यांनी सोनेरी यश मिळविले.

तिरंदाजीत भारताची घोडदौड
तिरंदाजीत भारताच्या तरुणदीप राय व गुरुशरण बेसरा यांनी पुरुषांच्या रिकव्‍‌र्ह एकेरी विभागात अंतिम फेरी गाठली. त्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक पक्के झाले. महिलांच्या रिकव्‍‌र्ह विभागात भारताच्याच दीपिकाकुमारी व बोम्बयला देवी लैश्राम यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. कंपाउंड प्रकारात अभिषेक वर्मा व रजत चौहान यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले. महिलांमध्ये पूर्वशा शेंडे व ज्योती सुरेखा यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.

जलतरणात तीन विक्रमांसह सात पदके
भारतीय जलतरणपटूंनी तीन विक्रमांसहीत सात पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. संदीप शेजवळ (पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक) व शिवानी कटारिया (महिला २०० मीटर फ्रीस्टाईल) यांनी वैयक्तिक शर्यतीत विक्रम नोंदवित सोनेरी कामगिरी केली. महिलांच्या चार बाय १०० मीटर फ्रीटाईल रिलेतही भारतीय खेळाडूंनी विक्रम प्रस्थापित केला व सुवर्णपदक मिळविले. दामिनी गौडा हिने भारतास आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तिने १०० मीटर बटरफ्लाय शर्यत जिंकली. सौरभ संगवेकर (२०० मीटर फ्रीस्टाईल) व सुप्रियो मोंडल (१०० मीटर बटरफ्लाय) या भारतीय खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये भारतास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.