प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या रचणे आणि त्यानंतर शांतपणे या धावसंख्येचा बचाव करणे या परंपरागत सूत्राला जागत युवा भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सहज विजय मिळवला. अजिंक्य रहाणे, मुरली विजय आणि रॉबिन उथप्पा यांनी केलेल्या छोटय़ा, पण उपयुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने १७८ धावांची मजल मारली. त्यानंतर हरभजन सिंग आणि अक्षर पटेलच्या अचूक फिरकीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा डाव १२४ धावांतच रोखला आणि ५४ धावांनी विजय साकारला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
झिम्बाब्वेतर्फे हॅमिल्टन मासाकाटझा आणि चामू चिभाभा यांनी ५५ धावांची खणखणीत सलामी दिली. कर्णधार रहाणेने गोलंदाजीत अचूक बदल करत हरभजनकडे चेंडू सोपवला आणि त्याने चिभाभाचा अडसर दूर केला. त्याने २३ धावा केल्या. पुढच्याच षटकात अक्षर पटेलने मासाकाटझाला बाद करत झिम्बाब्वेच्या धावगतीला वेसण घातली. त्याने एक चौकार आणि २ षटकारांसह २८ धावांची खेळी केली. अनुभवी चार्ल्स कोवेन्ट्रीला हरभजनने बाद केले. झिम्बाब्वेचा आधारस्तंभ असलेला इल्टॉन चिगंबुरा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा क्रेग इरव्हाइन मोहित शर्माच्या अचूक धावफेकीवर बाद झाला आणि झिम्बाब्वेच्या जिंकण्याच्या शक्यता मावळल्या. पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या सिकंदर रझाला बाद करत अक्षर पटेलने झिम्बाब्वेला पुनरागमनाची कोणतीही संधी मिळणार नाही याची काळजी घेतली. झिम्बाब्वेने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १२४ धावा केल्या. मासाकाटझाने सर्वाधिक २८ धावा केल्या. भारतातर्फे अक्षर पटेलने १७ धावांत ३ बळी घेतले.
तत्पूर्वी भारतीय संघाने १७८ धावांची मजल मारली. अजिंक्य आणि मुरली विजय यांनी ६४ धावांची मजबूत सलामी दिली. चोरटी धाव घेण्याच्या नादात मुरली विजय बाद झाला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह १९ चेंडूंत ३४ धावांची खेळी केली. रहाणेने रॉबिन उथप्पाला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. ग्रीम कीमरने अजिंक्यला बाद करत ही जोडी फोडली. रहाणेने ३२ चेंडूंत ३३ धावा केल्या. मनीष पांडेला केवळ १९ धावाच करता आल्या. ख्रिस्तोफर मोफूने त्याला बाद केले. केदार जाधवला ट्वेन्टी-२० पदार्पणात फक्त ९ धावा करता आल्या. स्टुअर्ट बिन्नीने ११, तर हरभजनने ८ धावा केल्या. उथप्पाने २ चौकारांच्या साहय़ाने नाबाद ३९ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेतर्फे ख्रिस्तोफर मोफूने सर्वाधिक ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ५ बाद १७८ (रॉबिन उथप्पा ३९, ख्रिस्तोफर मोफू ३/३३) विजयी विरुद्ध झिम्बाब्वे : २० षटकांत ७ बाद १२४ (हॅमिल्टन मासाकाटझा २८, अक्षर पटेल ३/१७)
सामनावीर : अक्षर पटेल