News Flash

IND vs ENG: विराटसेनेची इंग्लंडवर सरशी, कृणाल-कृष्णाचे दमदार पदार्पण

वनडे मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी

कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने आज (मंगळवारी) पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला प्रारंभ केला. उभय संघात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना  खेळवण्यात आला. यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी नमवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. डावाच्या सुरुवातीला महागड्या ठरलेल्या प्रसिध कृष्णाने उत्तरार्धात दमदार कमबॅक करत इंग्लंडला हादरे दिले. भारताकडून 98 धावांची खेळी साकारणाऱ्या धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंग्लंडचा डाव 

भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडसाठी सलामी दिली. बेअरस्टोने आक्रमक तर, रॉयने सावध पवित्रा धारण करत संघाचे 7व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. भारताचा पदार्पणवीर गोलंदाज प्रसिध कृष्णाला पहिल्या 3 षटकात 37 धावा चोपल्या गेल्या. यानंतर बेअरस्टो-रॉय जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान बेअरस्टोने अर्धशतक झळकावले. 14व्या षटकापर्यंत इंग्लंडने बिनबाद 135 धावा कुटल्या. त्यानंतर कृष्णाने रॉयला माघारी धाडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट साजरी केली. रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रॉयनंतर आलेला बेन स्टोक्स आपली छाप पाडू शकला नाही. कृष्णाने त्याला झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर विराटने मॉर्गनचा झेल सोडला. सलामीच्या पडझडीनंतर मॉर्गन-बेअरस्टो जोडीने दबाव झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात बेअरस्टोने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला. 66 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह बेअरस्टोने 94 धावांची खेळी केली.

बेअरस्टोच्या जाण्यानंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. भारताच्या गोलंदाजांनीही दमदार कमबॅक करत इंग्लंडला अडचणीत टाकले. शार्दुलने इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. मॉर्गन यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 22 धावा केल्या. तिखट मारा करणाऱ्या शार्दुलने जोस बटलरला पायचित पकडत इंग्लंडला संकटात टाकले. त्यानंतर मोईन अली आणि सॅम बिलिंग्ज जोडीेने संघर्ष केला. मात्र कृष्णाने बिलिंग्जला बाद करत ही जोडी फोडली. बिलिंग्जने 18 धावा केल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने मैदानावर स्थिरावलेल्या मोईन अलीला वैयक्तिक 30 धावांवर बाद केले. त्यानंतर कृणालने सॅम करनला बाद करत आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील पहिला बळी घेतला. सॅम करननंतर इंग्लंडचे शेपटाकडचे फलंदाज पराभव टाळण्यात अपयशी ठरले. भारताकडून प्रसिध कृष्णाने 54 धावांत 4 बळी घेत दमदार पदार्पण केले. शार्दुल ठाकूरने 3, भुवनेश्वरने 2 तर कृणालने एक बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारताचा डाव 

तत्पूर्वी, इंग्लंडकडून फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने भारतासाठी सलामी दिली. या दोघांनी संयमी सुरुवात केली. सुरुवातीला दबावात खेळणाऱ्या रोहितने 8व्या षटकात आक्रमक फलंदाजीचा पवित्रा धारण केला. 10 षटकात भारताने बिनबाद 39 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर 13व्या षटकात या दोघांनी भारताचे अर्धशतक पूर्ण केले.  त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित बटलरकरवी झेलबाद झाला. त्याने 42 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावांची संथ खेळी केली. यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत शिखर धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली. सामन्याच्या 24व्या षटकात या दोघांनी भारताला शंभरीपार नेले. याच षटकात धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. धवनच्या अर्धशतकानंतर विराटनेही झटपट अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला तंबुचा रस्ता दाखवला. विराटने 6 चौकारांसह 56 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

सामन्याच्या 39व्या शतकात धवनला शतकाने हुलकावणी दिली. स्टोक्सला फटका खेळताना धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. धवननंतर आलेल्या हार्दिक पंड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एक धाव काढून बाद झाला. हार्दिक पंड्या स्टोक्सचा तिसरा बळी ठरला. आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. भारत लवकर गाशा गुंडाळणार असे वाटत असताना पदार्पणवीर कृणाल पंड्या संघासाठी धावून आला. त्याने धावांसाठी झगडत असलेल्या राहुलला हाताशी घेत आक्रमक फलंदाजी केली. पदार्पणाच्या सामन्यात कृणालने दमदार अर्धशतक ठोकले. कृणालनंतर राहुलनेही फॉर्ममध्ये येत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58  तर, राहुलने 43 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 3 तर, मार्क वूडने 2 बळी घेतले.

कृणाल पंड्याचा विक्रम

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून कृणाल पंड्याच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. कृणालने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

कृणाल पंड्या आणि प्रसिध कृष्णाचे पदार्पण

टी-20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलेला मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांना आज संघाबाहेर बसवण्यात आले. त्यामुळे लोकेश राहुलकडे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली गेली. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून चमकदार कामगिरी केलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांनी आजच्या सामन्यातून  एकदिवसीय पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 9:42 pm

Web Title: india won first odi against england in pune adn 96
टॅग : India Vs England
Next Stories
1 एकीकडे पंड्या बंधू, दुसरीकडे करन बंधू!
2 पदार्पणाच्या सामन्यात कृणाल पंड्याचा विश्वविक्रम
3 वनडेत धवन सहाव्यांदा ‘नर्व्हस नाईंटीज’चा शिकार!
Just Now!
X