दक्षिण आफ्रिकेत २००७ साली पार पडलेला टी-२० विश्वचषक हा सर्व भारतीय क्रीडा प्रेमींच्या चांगलाच स्मरणात आहे. २४ सप्टेंबर २००७, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक मैदानावर तळ ठोकून भारताचा विजयाचा घास हिरावण्याच्या तयारीत होता. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना मिस्बाह उल हकने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि श्रीशांतच्या हातात चेंडू जाऊन बसल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. भारताच्या पहिल्या टी-२० विश्वचषकाला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र मिस्बाहच्या ज्या फटक्यामुळे भारताला विजय मिळाला त्याबद्दल त्याने एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलं होतं.

पाकिस्तानला चार चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार असणाऱ्या आणि त्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने फाईन लेगच्या दिशेने स्कूप फटका मारला. चेंडू आकाशात उंच गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या श्रीशांतने झेल टिपत पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. त्या फटक्यामुळे पाकिस्तान सामना आणि विश्वचषक हरला. पण तरीदेखील तो फटका मारल्याचा पश्चात्ताप होत नाही, असं मिस्बाहने २०१८ साली एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात क्रिकेट कारकिर्दीतील चढउतार याबाबत बोलताना मिस्बाहला २००७ च्या या सामन्यातील शेवटच्या फटक्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न जरी त्याला अनेकदा विचारण्यात आला असला, तरी त्याबाबत दिलखुलासपणे उत्तर त्याने यावेळी प्रथमच दिले. “त्या स्कूप शॉटबद्दल मला अजिबात पश्चात्ताप होत नाही. त्यावेळी विश्वचषक जिंकण्याची संधी आम्ही गमावली. त्याचे काही दिवस वाई़ट वाटले, हे खरे. पण आयुष्यात पुढे जात राहणे, ही गरज आहे. मी ही तेच केले,” असं मिस्बाह म्हणाला.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी ६ चेंडूत १३ धावा हव्या होत्या. स्ट्राईक वर येताच दुसऱ्या चेंडूवर मिस्बाहने षटकार लगावला होता. त्यामुळे पाकिस्तानचा विजय दृष्टीपथात होता. पण पुढील चेंडूवर स्कूपचा फटका मारून पाकिस्तानने अंतिम गडी, सामना आणि विश्वचषक गमावला.