सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा
भारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. रॉबिन सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने त्रिवंद्रूम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत श्रीलंकेवर २-० असा सोपा विजय मिळवला.
फिफा २०१८च्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर येथे दाखल झालेल्या भारतासाठी हा विजय प्रोत्साहन देणारा आहे. सहा वेळा सॅफ स्पध्रेचे जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुढील लढतीत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आतुर आहे. पहिले सत्र गोलशून्य राहिल्यानंतर दोन्ही संघांनी आकर्षक खेळ केला. २५ वर्षीय रॉबिनने दुसऱ्या सत्रात ५१व्या मिनिटाला सुनील छेत्रीच्या पासवर भारतासाठी पहिला गोल केला. या गोलनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने दमदार खेळ केला. ७३व्या मिनिटाला छेत्रीने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा रॉबिनने अचूकपणे गोलजाळीत टाकून भारताची आघाडी दुप्पट केली. तत्पूर्वी, संजू प्रधान आणि जेजे लॅल्पेखलुआ यांना मिळालेल्या संधीवर गोल करण्यात अपयश आल्याने भारताला २-० अशा विजयावरच समाधान मानावे लागले. रविवारी भारतासमोर नेपाळचे आव्हान असणार आहे.