कृष्णाचे सुवर्ण यश; सुहासला रौप्यपदक

टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या दिवशी भारताने बॅडमिंटन क्रीडा प्रकारात दोन पदकांची कमाई केली. कृष्णा नागरने हाँगकाँगच्या प्रतिस्पर्ध्याला नमवून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. सुहास यथिराजला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदक मिळाले. नेमबाजीत भारतीय क्रीडापटूंनी निराशा केली. मात्र गेल्या ५३ वर्षांतील ११ पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये फक्त १२ पदकांची कमाई केल्यानंतर यंदा पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकून भारताने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

बॅडमिंटन :  टोक्यो

जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या कृष्णा नागरने रविवारी भारतासाठी यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले. तर सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकून भारताची पदकसंख्या उंचावली.

पुरुष एकेरीतील एसएच-६ श्रेणीच्या अंतिम फेरीत २२ वर्षीय कृष्णाने हाँगकाँगच्या कोंग चू मन काइवर २१-१७, १६-२१, २१-१७ अशी तीन गेममध्ये मात केली. शनिवारी प्रमोद भगतने एसएल-३ श्रेणीत बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

कृष्णाने २०१९च्या जागतिक स्पर्धेत एकेरीत कांस्य आणि दुहेरीत रौप्यपदक मिळवले होते. अंतिम फेरीतील स्पर्धक चू मनविरुद्ध यापूर्वी झालेल्या तीनपैकी दोन लढतीत त्याने यश संपादन केले होते. त्यामुळे यंदाही कृष्णाने त्याच्यावर वर्चस्व गाजवले.

पुरुष एकेरीच्याच एसएल-४ श्रेणीतील अंतिम फेरीत ३८ वर्षीय सुहासला पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या अग्रमानांकित लुकास माजूरने सुहासवर १५-२१, २१-१७, २१-१५ अशी पिछाडीवरून सरशी साधली. दोन वेळच्या विश्वविजेत्या माजूरचे हे दुसरे पॅरालिम्पिक पदक ठरले. सुहास मात्र पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावणारा भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिलाच अधिकारी ठरला आहे.

नेमबाजी : अवनीसह तिघांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश

नेमबाजीतील अखेरच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना छाप पाडण्यात अपयश आले. ५० मीटर रायफल प्रोन मिश्र प्रकारात अवनी लेखाराला ६१२ गुणांसह पात्रता फेरीत २८व्या स्थानी समाधान मानावे लागले. सिद्धार्थ बाबूने ६१७.२ गुणांसह नववे स्थान मिळवले. भारताचा तिसरा नेमबाज दीपकला मात्र थेट ४६व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दीपकने ६०२.२ गुण कमावले.

खेळाडूंनी शब्द खरे करून दाखवल्याचे समाधान!

टोक्यो पॅरालिम्पिकला प्रारंभ होण्यापूर्वीच यंदा भारताचे क्रीडापटू किमान पाच सुवर्णासह एकूण १५ पदके पटकावतील, याची मला खात्री होती. आपल्या क्रीडापटूंनी माझा विश्वास सार्थ ठरवल्याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय पॅरालिम्पिक समितीची अध्यक्ष दीपा मलिकने व्यक्त केली. ‘‘टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी केलेली कामगिरी येणाऱ्या अनेक पिढय़ांना प्रेरणा देईल. त्याशिवाय युवा आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धेलासुद्धा चाहत्यांचा तितकाच पाठिंबा लाभेल, अशी आशा आहे,’’ असे दीपा म्हणाली.

प्रमोद-पलक यांचे कांस्यपदक हुकले

एकेरीत सुवर्णपदक मिळवणारा प्रमोद भगत आणि त्याची सहकारी पलक कोहली यांना मिश्र दुहेरीतील एसएल-३ श्रेणीच्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. जपानच्या देईसुके फुजिहारा आणि अकिको सुगिनो यांनी प्रमोद-पलक जोडीला २३-२१, २१-१९ असे पराभूत केले. शनिवारी उपांत्य फेरीत इंडोनेशियाचा हॅरी सुसान्टो आणि लेनी ओकटिला यांनी प्रमोद-पलक या भारतीय जोडीला २१-३, २१-१५ अशी सहज धूळ चारली होती.

माझे स्वप्न साकार झाले. आई-वडील, नातेवाईक, प्रशिक्षक यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. सध्या मी फक्त या क्षणाचा आनंद लुटणार आहे. यापुढील पॅरालिम्पिक स्पर्धामध्येही भारताचे सर्वच क्रीडापटू पदकांची लयलूट करतील, अशी आशा करतो.

– कृष्णा नागर

देशासाठी पदक जिंकल्यामुळे आनंदी होऊ की सुवर्णपदक हुकल्यामुळे निराश होऊ, हे मला कळेनासे झाले आहे. दुसऱ्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी असतानाही मी पराभूत झालो. आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेनच.

– सुहास यथिराज