भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी २०२३ च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले.

पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात १३ ते २९ जानेवारी रोजी होईल, असे एफआयएचने कळवले आहे. त्याचबरोबर एफआयएचच्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत स्पेन आणि नेदरलँड्सला २०२२च्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होते. भारतातील स्पर्धेचे ठिकाण अद्याप ठरले नसले तरी ओडिशातील भुवनेश्वर हे आता हॉकीचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे भुवनेश्वरमधील कलिंगा येथेच विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी चर्चा आहे.

विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.

भारतासह बेल्जियम आणि मलेशिया हे देश यजमानपदाच्या शर्यतीत होते. पण भारताची निविदा सर्वोत्तम ठरली. ‘‘२०२३च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठीची निविदा आम्ही जिंकलो, याचा आनंद होत आहे. स्वातंत्र्य मिळून भारताला २०२३ मध्ये ७५ वर्षे होत असल्यामुळे आता या स्पर्धेमुळे आमचा आनंद द्विगुणित होणार आहे. २०१८ मध्ये भारतात झालेली विश्वचषक हॉकी स्पर्धा यशस्वी ठरली होती. त्यामुळे गेल्या वेळचा अनुभव आमच्या गाठीशी असेल,’’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. २०२३च्या विश्वचषकाचे सर्वोत्तम आयोजन करून आम्ही पुन्हा एकदा खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करू, याची मला खात्री आहे.

मोहम्मद मुश्ताक, हॉकी इंडियाचे अध्यक्ष