ICC World Cup Squad 2019 या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत गेल्या काही दिवस अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर आज लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली असून ऋषभ पंत, अंबाती रायडू याना संघातून वगळण्यात आले आहे. याबरोबरच मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला संघात स्थान देण्यात आले नाही. पण त्याच्या ऐवजी केदार जाधव या मराठी चेहऱ्याला संघात संधी मिळाली आहे. विश्वचषक संघात केदार बरोबरच रोहित शर्मा हा देखील मराठी चेहरा भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

केदार जाधव

BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीची पसंती मिळाली आहे. तसेच हार्दिक पांड्या याच्या समवेत आणखी एक वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला रायडूपेक्षा प्राधान्य देण्यात आले. याशिवाय, लोकेश राहुल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी दिसला नाही. मात्र गेल्या काही काळात देशांतर्गत स्पर्धामध्ये आणि IPL मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा