विश्वचषक स्पर्धेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची घोषणा झाली. बीसीसीआयच्या मुख्यालयामध्ये कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, अंबती रायडू यासारख्या चेहऱ्यांना वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. मात्र त्याच वेळी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक खेळाडूंची पहिल्यांदाच विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

यापैकी जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक या खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे अनुभवी खेळाडूंच्या यादीतील धोनीची ही चौथी विश्वचषक स्पर्धा असेल तर कोहलीसाठी ही तिसरी विश्वचषक स्पर्धा असेल. रवींद्र जाडेजा, शिखर धवन, रोहित शर्मा, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार हे दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

दरम्यान यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीची पसंती मिळाली आहे. तसेच हार्दिक पांड्या याच्या समवेत आणखी एक वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला रायडूपेक्षा प्राधान्य देण्यात आले. याशिवाय, लोकेश राहुल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी दिसला नाही. मात्र गेल्या काही काळात देशांतर्गत स्पर्धामध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.