बांगलादेशविरुद्ध आज सराव सामना

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताची फलंदाजी पुरती कोलमडली होती. आता विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज होताना मंगळवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या सराव सामन्यात भारताला कामगिरी उंचवावी लागणार आहे. मात्र अनुभवी केदार जाधवची दुखापत आणि विजय शंकरला कमी सामन्यांचा अनुभव याची चिंता भारताला सतावत आहे.

ओव्हलच्या खेळपट्टीवर ट्रेंट बोल्टने स्विंग मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवले होते. न्यूझीलंडने सहा बळी राखून भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला आता सावध कामगिरी करावी लागणार आहे. केदार जाधव आणि विजय शंकर हे बांगलादेशविरुद्ध चांगली फलंदाजी करू शकले नाहीत तर भारताला ५ जून रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

सराव सामन्यात चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाचा मुद्दा सोडवण्याचे प्राथमिक ध्येय भारतीय संघाने ठेवले होते. मात्र हे दोघेही दुखापतीतून अद्याप न सावरल्यामुळे भारताच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. केदारच्या डाव्या हाताच्या खांद्याला ‘आयपीएल’दरम्यान दुखापत झाली होती. तसेच नेटमध्ये सराव करताना खलिल अहमदचा चेंडू विजयच्या हातावर आदळला होता. आता चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यजुर्वेद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडय़ा, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा, कुलदीप यादव.

बांगलादेश : मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, मुशफिकुर रहिम, महमुदुल्ला, शकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, शब्बीर रहमान, मोसाद्देक होसेन, मोहम्मद सैफीद्दीन, मेहिदी हसन, रुबेल होसेन, मुस्तफिझुर रहमान, अबू झायेद

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १