हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताला तिसरा सलामीवीर आणि दुसरा यष्टीरक्षक या राखीव पर्यायांची प्रमुख चिंता आहे. राष्ट्रीय निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने निभ्रेळ यश मिळवले. या मालिकेतील कामगिरीआधारे पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी आपले स्थान अंतिम ११ खेळाडूंमध्ये पक्के केले आहे.

पृथ्वीसोबत सलामीवीर म्हणून निवड समिती लोकेश राहुललाच प्राधान्य देईल. तो मागील १७ डावांपैकी १४ डावांमध्ये अपयशी ठरला आहे. परंतु या प्रदीर्घ दौऱ्यासाठी राखीव सलामीवीरसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे.

‘‘लोकेशच्या फलंदाजीत काही त्रुटी आहेत. मात्र तो त्यात सुधारणा करील. परंतु सामन्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन चांगला आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी सामन्यानंतर व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर अ‍ॅडलेडच्या कसोटीत पृथ्वी-लोकेश जोडीवरच सलामीची मदार असेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांक अगरवाल हा सलामीसाठी तिसरा पर्याय होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडल्या जाणाऱ्या १७ खेळाडूंच्या संघातसुद्धा मयांक हाच सर्वोत्तम पर्याय असेल. मयांकचा समावेश न झाल्यास करुण नायरला संधी मिळू शकते. अनुभवी फलंदाज मुरली विजयच्या नावाचासुद्धा विचार केला जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या मुरलीने नुकतेच निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्याबाबत मतप्रदर्शन केले होते. परंतु भारतीय संघातून वगळल्यानंतर इसेक्सकडून कौंटी क्रिकेट खेळताना त्याने ५६, १००, ८५, ८० धावा केल्या होत्या. याशिवाय रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांची त्याची कामगिरीसुद्धा विचारात धरता येईल.