21 February 2019

News Flash

भारतीय ‘अ’ संघाला विजयासाठी १९९ धावांची गरज

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४३ धावा केल्या होत्या. यात उस्मान ख्वाजाच्या नाबाद शतकाचा समावेश होता.

प्रातिनिधिक छायाचित्र

बेंगळूरु : भारतीय ‘अ’ संघाला दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकण्यासाठी बुधवारी अखेरच्या दिवशी आणखी १९९ धावांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने विजयासाठी २६२ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ६३ अशी मजल मारली. खेळ थांबला, तेव्हा मयांक अगरवाल २५ आणि अंकित बावणे ६ धावांवर खेळत होते.

भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात सुरुवात खराब झाली. अभिमन्यू इसवारान (०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२८) लवकर बाद झाल्यामुळे भारताची ९.१ षटकांत २ बाद ३३ अशी अवस्था झाली होती.

त्याआधी, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सकाळी १ बाद ४२ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने प्रारंभ केला. मात्र उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श झटपट बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची ४ बाद १३४ अशी अवस्था झाली. परंतु ट्रॅव्हिस हेडने १३ चौकारांसह १६२ चेंडूंत ८७ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाला २९२ ही धावसंख्या उभारून दिली.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुसऱ्या डावातसुद्धा प्रभावी ठरला. त्याने ७७ धावांत ३ बळी घेतले. फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४३ धावा केल्या होत्या. यात उस्मान ख्वाजाच्या नाबाद शतकाचा समावेश होता.

सिराजने ५९ धावांत ८ बळी मिळवले होते. मग भारताने अंकित बावणेच्या (९१) अर्धशतकीच्या खेळीच्या बळावर पहिल्या डावात २७४ धावा करताना ३१ धावांची आघाडी घेतली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव): २४३

भारत ‘अ’ (पहिला डाव): २७४

ऑस्ट्रेलिया ‘अ’ (दुसरा डाव) : ८३.५ षटकांत सर्व बाद २९२ (ट्रॅव्हिस हेड ८७, उस्मान ख्वाजा ४०; मोहम्मद सिराज ३/७७)

भारत ‘अ’ (दुसरा डाव) : २० षटकांत २ बाद ६३ (श्रेयस अय्यर २८, मयांक अगरवाल २५ ; ख्रिस ट्रिमेन १/१६)

First Published on September 5, 2018 3:58 am

Web Title: indian a team needed 99 runs to win against australia a