भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता नव्या भूमिकेत समोर येणार आहे. भारतीय संघातून बाहेर गेल्यानंतर इरफान गेले काही वर्ष आयपीएलमध्ये खेळत होता, मात्र अकराव्या हंगामात इरफानवर कोणत्याही संघमालकाने बोली लावली नाही. यामुळे इरफानच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागल्याचं बोललं जातंय. मात्र या सर्व घटनांनंतर इरफान पठाण आता आपल्या नवीन भूमिकेत दिसणार आहे. २०१८-१९ सालासाठी इरफान पठाण जम्मू काश्मीर संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिक बुखारी यांनी इरफान प्रशिक्षकपदी येण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ३३ वर्षीय इरफान पठाणने २९ कसोटी, १२० वन-डे आणि २४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये इरफान गेले काही वर्ष बडोद्याच्या संघाचं नेतृत्व करत होता. मात्र नवीन वर्षात पठाणच्या खांद्यावर आता प्रशिक्षणाची जबाबदारी असणार आहे.