आठवडय़ाची मुलाखत – दीपिका कुमारी, भारताची तिरंदाज

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये रिक्त हस्ते मायदेशी परतावे लागल्याने यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी मी आतुर आहे. प्रचंड मेहनत घेऊनही मला पदकापर्यंत झेप घेता आलेली नाही. त्यामुळे यंदा ऑलम्पिक पदक जिंकूनच मायदेशी परतणार, असा विश्वास भारताची अव्वल नेमबाज दीपिका कुमारी हिने व्यक्त केला.

नुकत्याच गुएटमाला येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दीपिकाने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. विश्वचषक स्पर्धेत दीपिकाने आतापर्यंत तीन वैयक्तिक आणि चार सांघिक सुवर्णपदके तसेच प्रत्येकी सात वैयक्तिक आणि सांघिक रौप्यपदके आणि पाच कांस्यपदके जिंकून आपली छाप पाडली आहे. तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि तिच्या कामगिरीविषयी दीपिकाशी केलेली ही बातचीत-

करोनाच्या साथीचा तुझ्या कामगिरीवर कितपत परिणाम झाला आहे?

करोनाच्या टाळेबंदीच्या काळात अनेक गोष्टी आमच्यासमोर संकट म्हणून उभ्या राहिल्या. तिरंदाजी करता येत नव्हती. सुरुवातीच्या काही महिन्यांत आम्ही चाचपडत होतो. शरीराची ठेवण राखण्यात तसेच तंदुरुस्तीमध्ये आम्ही कमी पडत होतो, पण जसजशी वेळ निघून गेली, तसतसे आम्ही स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. काही स्पर्धामध्ये खेळण्याची संधी हिरावल्यामुळे नाराज व्हायला झाले. पण गुएटमालामध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, त्यात चांगली कामगिरी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये तू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, या वेळी कितपत दडपण आहे?

ऑलिम्पिक हे खेळातील सर्वोच्च शिखर असले तरी आमच्यासाठी एखाद्या स्पर्धेइतकेच त्याचे महत्त्व असते. ऑलिम्पिकमध्ये खेळताना खांद्यावर खूप जबाबदारी असते. संपूर्ण देशाच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या असतात. दडपणाचा सामना करताना मानसिक कणखरता महत्त्वाची असते. या सर्व गोष्टींचा भार उचलत आपल्याला चांगली कामगिरी करावी लागते.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी काय रणनीती आखली आहेस?

रणनीती खास नसेल. तंदुरुस्त राहून मानसिक कणखरता वाढवण्यावर आमचा भर आहे. सामने सुरू असताना मनात वेगवेगळे विचार येत असतात. त्यामुळे लक्ष विचलित होत असते. त्याचा परिणाम खेळावर होत असतो. गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये त्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे स्वत:चे कौशल्य सुधारण्याबरोबरच मानसिक स्थैर्य राखण्यावर आम्ही मेहनत घेत आहोत. तिरंदाजी हा प्रकार स्टेडियमबाहेर खेळवला जात असल्याने वेगळ्या तयारीची गरज नसते. वेगळ्या अंदाजात विचार करून प्रतिस्पध्र्यावर कशी मात करता येईल, ही रणनीती मला आखावी लागणार आहे.

प्रथमच ऑलिम्पिकपूर्वी परदेशात जाऊन किंवा स्पर्धामध्ये खेळण्याची संधी कमी मिळाली आहे, त्याचा कामगिरीवर परिणाम होऊ शकेल का?

सध्याच्या वेळापत्रकानुसार आम्ही काही दिवस आधी टोक्योमध्ये जाऊन विलगीकरणातच सराव करणार आहोत. यामध्ये बदल होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. त्यात बदल झाला तरी मानसिकदृष्टय़ा ते स्वीकारण्याची आमची तयारी आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव गाठीशी असल्याने आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक लढत ही आमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे वैयक्तिक प्रकारासह सांघिक प्रकारामध्येही कामगिरी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची कितपत अपेक्षा आहे?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी मी आतुर आहे. गेल्या दोन वेळेला पदकाविनाच मायदेशी परतावे लागल्याने मी निराश झाले होते. त्यामुळे माझ्यासाठी ‘करो अथवा मरो’ अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. त्यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेत पदकाला गवसणी घालण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही परिस्थितीत पदक जिंकण्यासाठी आमचा कसून सराव सुरू आहे.