स्वित्र्झलड दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज लुसान येथे रंगणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहेत.

भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांनी प्रवासाच्या बाबतीत भारतावर र्निबध आणले आहेत. आता भारतीय तिरंदाज पॅरिस येथे २३ जूनपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतील. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाला ही शेवटची संधी असेल.

‘‘स्वित्र्झलड दूतावासाने आम्हाला थोडय़ा कालावधीसाठीचा व्हिसा नामंजूर केला आहे. त्यामुळे आमच्याकडे विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फार कमी वेळ शिल्लत होता. आता आमचे लक्ष पॅरिसमध्ये रंगणाऱ्या तिसऱ्या टप्प्याकडे लागले आहे,’’ असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले.

आतापर्यंत भारताच्या पुरुष संघाने आणि महिलांमध्ये वैयक्तिकपणे टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. पॅरिसमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांच्या विलगीकरणात सूट मिळावी, अशी अपेक्षा भारतीय तिरंदाजी संघटनेला आहे.