भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) अखेर आठ वर्षांनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबरोबरच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये (एनएसएफ) झाला आहे.

‘एएआय’च्या नवीन पदाधिकाऱ्यांची या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच १८ जानेवारीला निवडणूक झाली होती. मात्र क्रीडा मंत्रालयाची संघटनेला मान्यता नसल्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदांवर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. मात्र आता अधिकृत मान्यता मिळाल्याने अर्जुन मुंडा अध्यक्षपदी, तसेच प्रमोद चांदूरकर (महासचिव) आणि राजेंद्र सिंग तोमार (खजिनदार) यांची निवड ग्राह्य़ धरण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरणाप्रमाणे (२०११) उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यांच्या नेमणुका झाल्या नसल्याचा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्या नेमणुकांसाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश ‘एएआय’ला देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे  नियमांचे पालन करण्यात आले नाही तर पुन्हा ही मान्यता काढून घेण्यात येईल, असेही क्रीडा मंत्रालयाने  चार पानांच्या पत्रात स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या ‘एएआय’च्या निवडणुकांना जागतिक तिरंदाजी संघटनेसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेने याआधीच मान्यता दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही राष्ट्रीय क्रीडा धोरण २०११ प्रमाणे निवडणुका न घेण्याचा ठपका ‘एएआय’वर ७ डिसेंबर २०१२ मध्ये ठेवण्यात आला होता.