भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राने फ्रान्सच्या सोतेविले शहरात सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. त्यामुळे आगामी आशियाई खेळांमध्ये नीरजकडून अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

या स्पर्धेत भारताचा २०१२ मधील चॅम्पियन केशर वालकोटला खास कामगिरी बजावता आली नाही. केवळ ७८.२६ मीटर पर्यंत भालाफेक करत त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या कामगिरीनंतर अनेक सेलिब्रेटी खेळाडूंनी ट्विट करुन नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे.

नीरजने २०१६ मध्ये वर्ल्ड अंडर-२० अॅथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ८६.४८ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते. त्याने ज्युनियर लेव्हलवर विक्रमही प्रस्थापित केला होता. मात्र त्याचवर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी तो क्वालिफाय होऊ शकला नव्हता.