धनंजय रिसोडकर

अर्जेटिनातील ब्यूनस आयर्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथमच सुवर्णपदकाची कमाई करीत पदकतालिकेत गरुडभरारी घेण्यात योगदान दिले. भारतीय युवकांनी केलेल्या या अफलातून कामगिरीमुळे नजीकच्या दोन ऑलिम्पिक्समध्येदेखील भारत मागील काळापेक्षा मोठी झेप घेऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. १४ ते १७ वर्षांचे हे युवा खेळाडू त्यांच्या खेळांमधील भारताचे भविष्यातील सर्वात मोठे तारे ठरल्यास नवल वाटू नये.

भारतीय वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालनिरुंगाने भारताला युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर थबाबीदेवीने ज्युडो या खेळात भारताला प्रथमच आणि तेदेखील थेट सुवर्णपदक मिळवून देण्याचा सन्मान पटकावला. याचप्रमाणे ध्वजवाहकाचा मान देण्यात आलेल्या मनू भाकरनेदेखील विश्वास सार्थ ठरवत भारताला नेमबाजीत अजून एका सुवर्णपदकाची कमाई करून दिली. त्याशिवाय नऊ रौप्यपदके आणि एक कांस्यपदक अशा जबरदस्त कामगिरीमुळे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच पदकसंख्या दुहेरी करण्यात यश मिळाले. तब्बल १३ पदकांची कमाई करीत भारताने यंदाच्या युवा ऑलिम्पिकमध्ये थेट १७व्या स्थानावर उडी घेतली आहे. भारताच्या या तिघा युवकांनी संधीचे ‘सोने’ केल्यामुळेच भारताला ही मोठी झेप घेणे शक्य झाले आहे. त्यामुळेच यंदाच्या पदकतालिकेत भारत जर्मनी आणि ब्रिटनपेक्षाही अग्रस्थानी विराजमान झाला आहे. अन्यथा यापूर्वी झालेल्या दोन युवा ऑलिम्पिक्समध्ये भारताचे पदकतालिकेतील स्थान थेट पन्नाशीच्या पुढचे होते. त्या तुलनेत भारताची या वेळची कामगिरी ही विशेष नजरेत भरण्यासारखीच ठरली आहे.

२०१० साली सर्वप्रथम युवा ऑलिम्पिकचे आयोजन हाँगकाँगमध्ये करण्यात आले होते. पहिलीच युवा ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने त्या वेळी या स्पर्धेकडे युरोपीय देशांनी फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र चीनने पहिल्यापासूनच या स्पर्धेत रस घेतल्याने पहिल्या दोन स्पर्धामध्ये प्रथम तर यंदाच्या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावत आपला दबदबा कायम राखला आहे. अवघ्या १४ ते १७ या जोशपूर्ण युवावस्थेत या खेळाडूंना थेट विश्वातील सर्व देशांमधील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करायला मिळते. त्यात यश मिळाले तर आत्मविश्वास बळावतो आणि अपयश आले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा, त्याचा अदमासदेखील त्यांनी अशा स्पर्धेतून येतो.

आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील पदकविजेत्या भारतीय खेळाडूंची नावे आणि त्यांचे प्रांत असे वर्गीकरण केल्यास या पदकविजेत्यांपैकी सर्वाधिक पदके ही उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील खेळाडूंनी मिळवून दिल्याचे अधोरेखित होते. भारताच्या या भागांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे रुजली असल्याचे ते द्योतक आहे. तसेच त्या राज्यांकडून खेळाडूंना मिळणाऱ्या सातत्यपूर्ण आर्थिक पाठिंब्यासह प्रोत्साहनाचा तो परिपाक आहे. युवा ऑलिम्पिक हे आता ऑलिम्पिकमधील पदकाची गुरुकिल्लीच ठरू लागले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय संघटकांकडून युवा ऑलिम्पिकचे महत्त्व जाणण्याची आवश्यकता आहे.

अ‍ॅथलेटिक्समध्येही चमक

मध्य प्रदेशच्या सूरज पनवारने जलद चालण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक तर तामिळनाडूच्या प्रवीण चित्रावेलने तिहेरी उडीतील कांस्यपदक पटकावत अ‍ॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात भारताला प्रथमच तब्बल दोन पदके मिळवून दिली. अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला यापूर्वीच्या दोन ऑलिम्पिक्समध्ये केवळ एकच पदक मिळाले असताना या दोन्ही खेळाडूंची कामगिरीदेखील तितकीच आश्वासक आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही यश

कोणत्याही खेळाडूला त्याचा आहार त्याच्या आरोग्यानुसार आणि शारीरिक गरजांनुसार दिला तरच ते खेळाडू कामगिरीचा दर्जा सतत उंचावू शकतात. मात्र भारतीय खेळाडूंसाठी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय जेवण न मिळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे आहारात ऐनवेळी बरेच बदल करून किंवा न रुचणारे अन्न खाऊनदेखील खेळाडूंनी ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली, हे दखल घेण्याजोगे आहे. निदान पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तरी खेळाडूंना भारतीय आहार मिळण्याबाबत अधिक दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे.