राष्ट्रकुलमधील यशाची मालिका कायम राखण्याचा निर्धार

जकार्ता : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक खेळांमुळे अनपेक्षितरीत्या अव्वल दर्जाचे यश मिळवले आहे. या पाश्र्वभूमीवर २०२०मध्ये जपानला होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाच्या दृष्टिकोनातून भारतीय खेळाडूंसाठी येथे रंगीत तालीमच असणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा येथे खेळाडूंना पदक मिळवण्याच्या मार्गात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या वर्चस्वास तडा देणाऱ्या चीनच्या खेळाडूंचे मुख्य आव्हान असणार आहे. त्याचबरोबर जपान, दक्षिण कोरिया, अझरबैजान, कझाकिस्तान, इराण, यजमान इंडोनेशिया यांच्याही खेळाडूंकडून भारतास आव्हान आहे. हे सर्वच देश आगामी ऑलिम्पिकसाठी आपली कितपत तयारी झाली आहे, याची चाचपणी येथील स्पर्धेद्वारे करीत असल्यामुळे सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. भारताने गतवेळच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ११ सुवर्णपदकांसह ५७ पदकांची कमाई केली होती. यंदा त्यामध्ये आणखी सहा-सात पदकांची भर अपेक्षित आहे.

बास्केटबॉल : भारताची निराशाजनक कामगिरी

बास्केटबॉलमधील महिलांच्या लढतीत भारताला कझाकिस्तानकडून ६१-७९ असा पराभव स्वीकारावा लागला. कझाकिस्तानच्या झेलिना कुराजोवा व तमारा योगादिकावा यांनी कौतुकास्पद खेळ केला. भारताच्या रासप्रित सिंधू व स्टेफी निक्सन यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

हँडबॉल : इराककडून पराभव

पुरुषांच्या हँडबॉलमध्ये भारताच्या पराभवाची मालिका कायम राहिली. त्यांना इराकने ४०-२९ असे सहज हरवले. भारतातर्फे दीपक अहलावत आणि करमजीत सिंग यांनी अनुक्रमे ८ व ६ गुण मिळवले. मात्र तरीही भारताला पराभव पत्करावा लागला.

बॅडमिंटन : कठीण कार्यक्रमपत्रिका

बॅडमिंटनमध्ये पदक मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंचा मार्ग खडतर राहणार आहे. गतवेळी कांस्यपदक मिळवणाऱ्या भारताला महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित जपानशी खेळावे लागणार आहे. पहिल्या फेरीत भारताला पुढे चाल मिळाली आहे. पुरुषांमध्ये भारताला पहिल्या फेरीत मालदीवला हरवताना काही अडचण येणार नाही. परंतु नंतर त्यांच्यापुढे इंडोनेशियाचे आव्हान आहे.

बॉक्सिंगमध्ये चांगली संधी

बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी, मनोजकुमार, सोनिया लाथेर, सर्जूबाला देवी या अनुभवी खेळाडूंवर भारताच्या पदकाच्या आशा अवलंबून आहेत. भारतीय खेळाडूंना परदेशी प्रशिक्षक व परदेशातील स्पर्धात्मक अनुभव याबाबत संघटकांनी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. आता खेळाडूंवरच सर्वोच्च कौशल्य दाखविण्याची जबाबदारी आहे.

स्क्वॉशमध्ये चार पदकांची अपेक्षा

भारताने गतवेळी पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यंदाही हीच परंपरा पुढे ठेवली जाण्याची अपेक्षा आहे. वैयक्तिक विभागात सौरव घोषाल याच्याकडून सोनेरी कामगिरी अपेक्षित आहे. महिलांमध्ये दीपिका पल्लिकल व जोत्स्ना चिनप्पा या अनुभवी खेळाडूंवर भारताची मुख्य मदार आहे.

नौकानयनमध्ये दोन सुवर्णपदकांची आशा

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ व स्वर्ण सिंग यांच्याकडून येथे सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. त्यांच्याबरोबरच कॉक्स्ड फोर, कॉक्सलेस पेअर्स आदी क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा दिसेल अशी अपेक्षा आहे. नौकानयनमध्ये भारताचे ३४ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंना दोन महिने परदेशी प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे.

कबड्डीत दुहेरी मुकुटाची संधी

कबड्डी हा आशियाई स्पर्धेसाठी भारतास सोनेरी क्षणांची संधी देणारा हुकमी क्रीडाप्रकार ठरला आहे. आपल्या मातीत जन्म झालेल्या या खेळात आतापर्यंत भारताने पुरुष व महिलांमध्ये निर्विवाद हुकमत गाजविली आहे. यंदा मात्र त्यांच्यापुढे इराण, दक्षिण कोरिया, जपान यांचे आव्हान असणार आहे. या संघांनी या खेळात लक्षणीय प्रगती केली आहे याचा प्रत्यय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आला आहे.