करोनामुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सच्या पात्रता स्पर्धा आठ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचा फटका ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू पाहणाऱ्या भारताच्या खेळाडूंना बसणार असल्याचे राष्ट्रीय साहाय्यक प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी म्हटले आहे.

‘‘तेजिंदर पाल सिंग तूर (गोळाफेक), अनू राणी (भालाफेक), एम. श्रीशंकर (लांब उडी), द्युती चांद, हिमा दास (दोघी धावपटू) यांना जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या पात्रता स्पर्धा नोव्हेंबपर्यंत रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. अनेक देशांना अजून करोनामधून कधी बाहेर येऊ याचाच अंदाज येत नाही. त्यातच पात्रता स्पर्धेसाठी खेळाडूंना दोन वर्षांचा कालावधी देणे नियमाने चुकीचे आहे,’’ असे नायर यांनी स्पष्ट केले.

लांब पल्ल्याच्या शर्यती आणि चालण्याची शर्यत वगळली तर अ‍ॅथलेटिक्समधील सर्व प्रकारच्या पात्रता स्पर्धा मे २०१९ मध्येच सुरू झाल्या आहेत. त्याचा कालावधी या वर्षी जूनमध्ये संपत आहे. मात्र टोक्यो  ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर पडल्याने पात्रता स्पर्धेचा कालावधी १ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. हा कालावधी २९ जून २०२१ मध्ये संपणार आहे, याकडे नायर यांनी लक्ष वेधले.