सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या खेळाडूंची कारकीर्द घडवणारे बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. तेलगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुधीर बाबू या चित्रपटात गोपीचंद यांची भूमिका साकारणार आहे. सुधीर बाबु हा देखील उत्तम बॅडमिंटनपटू आहे, त्यामुळे तो ही भूमिका उत्कृष्टपणे वठवेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. गोपीचंद यांच्या ४४ व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत, चित्रपट व्यापार विश्लेषक तरन आदर्श यांनी याविषयी माहिती दिली आहे. हा सिनेमा हिंदी आणि तेलगु या दोन्ही भाषांमध्ये असून, अबुंदातिया एण्टरटेनमेन्ट आणि फॉक्स स्टार स्टुडीओज या निर्मितीसंस्था या चित्रपटाची निर्मीती करणार आहेत. याआधी सुधीर बाबूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाविषयी आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडापटूंच्या जिवनावर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मेरी कोम, एमएस धोनी यांच्या आयुष्यावरील चित्रपटांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दर्शवली होती. पुलेला गोपीचंद यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट, एखाद्या बॅडमिंटपटूवर बनवला जाणारा दुसरा चित्रपट ठरणार आहे. याआधी सायना नेहवालच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, श्रद्धा कपूर या सिनेमात सायनाची भूमिका करणार आहे. श्रद्धा कपूरला प्रशिक्षण देताना सायना नेहवालने आपला काही फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते.

सुधीर बाबूने याआधी प्रेमकथा चित्रम, बाघी यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सुधीर बाबूहा एकेकाळी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतला आघाडीचा बॅडमिंटनपटू म्हणून ओळखला जायचा. याचसोबत सुधीर काही स्पर्धांमध्ये दुहेरी सामन्यात गोपीचंदसोबत खेळला आहे. या चित्रपटात पुलेला गोपीचंद यांचा प्रवास, ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद, त्यासाठी घेतलेली मेहनत दाखवण्यात येणार असल्याचं कळतंय. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून, २०१८ च्या मध्यापर्यंत या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.