04 July 2020

News Flash

आयबीएल ग्लॅमरस ?

इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बॅडमिंटनमध्ये ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ ही संकल्पना अवतरली. मात्र आयपीएलमध्ये क्षणोक्षणी-पदोपदी जाणवणाऱ्या ग्लॅमर तडक्याची उणीव आयबीएलमध्ये प्रामुख्याने जाणवली.

| September 4, 2013 01:17 am

इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बॅडमिंटनमध्ये ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ ही संकल्पना अवतरली. मात्र आयपीएलमध्ये क्षणोक्षणी-पदोपदी जाणवणाऱ्या ग्लॅमर तडक्याची उणीव आयबीएलमध्ये प्रामुख्याने जाणवली. मुंबईत झालेल्या प्राथमिक फेरीच्या दोन लढती आणि अंतिम लढत होऊनही आयपीएलमध्ये हमखास उपस्थिती लावणाऱ्या बॉलीवूडकरांनी बॅडमिंटनला तोच न्याय दिला नाही. इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेचे पडघम वाजू लागल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता आणि बॅडमिंटनची उत्तम जाण असलेला आमीर खान आणि अभिनेत्री होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू असलेल्या दीपिका पदुकोणला ब्रँण्ड अ‍ॅम्बॅसिडर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अखेपर्यंत ही योजना कागदावरच राहिली. या दोघांचा सहभागाने स्पर्धेच्या आकर्षणात निश्चित भर पडली असती आणि पर्यायाने स्पर्धा लोकप्रिय होण्यास मदत होऊ शकली असती. मात्र तसे झालेच नाही. एरव्ही आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने संघमालक, हितचिंतक, मित्रपरिवार, प्रेक्षक या भूमिकांतून सातत्याने सहभागी होणाऱ्या बॉलीवूडकरांनी बॅडमिंटनला मात्र दूरच सारले.
या ग्लॅमरची साथ नसल्याने आयकॉन खेळाडूंनीच हा वसा आपल्या हाती घेतला. बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध ज्वाला गट्टा स्पर्धेत केवळ दोन सामने खेळली. मात्र तिची डगआऊटमधील उपस्थितीच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सामन्यादरम्यान ‘ज्वाला-ज्वाला’ असा जयघोष करणाऱ्या प्रत्येकाला व्हिक्टरी चिन्हासह ज्वाला प्रतिसाद देताना दिसली. स्पर्धेदरम्यान ट्विटरवर ज्वाला आणि तिच्या चाहत्यांमधला हद्य संवादही तिच्या तगडय़ा फॅनफॉलोइंगची साक्ष देणारा होता.
आपल्या खणखणीत प्रदर्शनासाठी सायना नेहवाल ओळखली जाते. ‘शब्दांपेक्षा रॅकेट बोलकी’ असल्याचा प्रत्यय देणाऱ्या सायनाने स्पर्धेदरम्यान तौफिक हिदायतसारखा महान खेळाडू आणि संघसहकाऱ्यावर टीकास्त्र सोडले. जोरदार बॉडीलाइन स्मॅशच्या बरोबरीने वाग्बाण परजण्याताही वाकबगार असल्याचे तिने दाखवून दिले. मात्र हे सगळं सुरू असताना तौफिक खुप अनुभवी खेळाडू आहे, आम्ही त्याचंच ऐकतो हे सांगत तौफिकसह तिचे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साइट्सवर
झळकत होते. त्यामुळे हा मामला केवळ ‘बोलाची कढी बोलाचा भात’ आहे याची जाणीव नक्कीच होत होती.
आपले प्रशिक्षक गोपीचंद यांच्याप्रमाणे शांत, संयमी वावरणाऱ्या सायनाचे व्यक्तिमत्त्व आयबीएलच्या निमित्ताने आणखीनच खुलले. प्रत्येक चाहत्याच्या अभिवादनाला प्रतिसाद असो किंवा तिच्या सामन्यासाठी प्रचंड संख्येने गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानणे असो किंवा हॉटशॉट्स संघाच्या र्मचडाइज कॅम्पेनच्या निमित्ताने चाहत्यांना दिलेल्या भेटी असोत. आयबीएल स्पर्धेचा डोलारा ज्यांच्यावर अवलंबून आहे अशी सायना या स्पर्धेच्या निमित्ताने अधिक व्यक्त होताना दिसली. खऱ्या ग्लॅमरच्या अभावामुळे या खेळाडूंनाच आपल्या व्यक्तिमत्त्वाला ही किनार जोडावी लागल्याचे चित्र आयबीएलमध्ये दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2013 1:17 am

Web Title: indian badminton league a glamorous mode
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 गॅरेथ बेलसाठी रिअल माद्रिदने मोजले तब्बल ८८४ कोटी
2 मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे राही सरनोबतचा गौरव
3 कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलमुळेच भारत-बांगलादेश लढत बरोबरीत
Just Now!
X