दिमाखदार पहिल्या हंगामासह इंडियन बॅडमिंटन लीगने (आयबीएल) दणक्यात पदार्पण केले. मात्र आर्थिक समीकरणे बिघडल्याने सलग दोन वर्ष दुसऱ्या हंगामाचे आयोजन होऊ शकले नाही. लीगचे आयोजक स्पोर्टी सोल्युशन्स आणि भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्यातील ताणलेल्या संबंधाचा हा परिणाम होता. या प्रकरणातून मिळालेल्या धडय़ातून बोध घेत भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्वबळावर पुढील वर्षी लीगचा दुसरा हंगाम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. जानेवारी महिन्यात लीगचे सामने होतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दासगुप्ता यांनी सांगितले.
‘‘थॉमस-उबेर चषक, सुपर सीरिज तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून स्वबळावर लीग आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जेणेकरून भविष्यातही लीगचे आयोजन नियमित तत्वावर होईल. १७ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या वेळापत्रकात जागा आहे. या कालावधीतच लीगचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे हे दोन संघ आहेत. त्यामुळे पुण्याऐवजी चेन्नईला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.’’ असे दासगुप्ता यांनी पुढे सांगितले.