चाचपडत प्रारंभ केल्यानंतर झंझावाती खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या अवध वॉरियर्सची इंडियन बॅडमिंटन लीगच्या उपांत्य फेरीच्या निमित्ताने गुरुवारी मुंबई वॉरियर्सशी गाठ पडणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला ली चोंग वेई ताफ्यात असूनही मुंबई मास्टर्सला अपेक्षित वर्चस्व गाजवता आलेले नाही.
अवधने साखळी गटातल्या पाच लढतींपैकी तीनमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे, तर दुसरीकडे मुंबईने पाचपैकी केवळ दोन लढतीत विजयी होत उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे. अवधसाठी पी. व्ही. सिंधूचा फॉर्म ही जमेची बाजू आहे. गुवांगझाऊ येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूला आयबीएलच्या पहिल्याच लढतीत सायना नेहवालकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवाने खचून न जाता सिंधूने जबरदस्त पुनरागमन केले आहे. टायने बून आणि ज्युलियन शेंक या मातब्बर खेळाडूंना नमवण्याची किमया तिने केली आहे. यामुळे आयकॉन खेळाडू असलेल्या सिंधूवर मोठी जबाबदारी आहे.
पुरुष एकेरीत आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि कदम्बी श्रीकांत या युवा खेळाडूंवर अवधची भिस्त आहे. यावर्षी थायलंड स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या श्रीकांतने अफलातून खेळ करत दिग्गज खेळाडूंसमोर आव्हान उभे केले आहे. साखळी गटातही ली चोंग वेईसारख्या दमदार प्रतिस्पर्धीसमोर त्याने चांगला खेळ केला होता. मॅथिअस बो आणि मार्किस किडो ही पुरुष दुहेरीतील अनुभवी जोडी अवधचे बलस्थान आहे. मिश्र दुहेरीत मार्किसने आपली बहीण पिआ झेबाडिथच्या साथीने खेळताना अवधला शानदार विजय मिळवून दिला आहे. एकेरी प्रकारात अवधकडे अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. मात्र दुहेरीत अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे अवधच्या संघाला संतुलितपणा लाभला आहे.
मुंबई संघासाठी ली चोंग वेई हुकमी एक्का आहे. साखळी लढतीतल्या काही सामन्यांत ली चोंग वेईसमोर युवा भारतीय खेळाडूंनी आव्हान उभे केले होते. मात्र अनुभवाच्या जोरावर लीने सरशी साधली. अवधविरुद्ध ली मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. व्लादिमीर इव्हानोव्ह हा उंचपुरा खेळाडू मुंबईसाठी उपयुक्त आहे. एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात त्याने नैपुण्य दाखवले आहे. मात्र दुहेरीमध्ये त्याला एन.सिक्कीच्या बरोबर खेळताना सुसुत्रता वाढवावी लागेल. टायने बूनच्या रुपात मुंबईकडे महिला एकेरीसाठी अनुभवी खेळाडू आहे मात्र खराब फॉर्म आणि वाढते वय यामुळे ही जबाबदारी पी.सी.तुलसीवर येऊ शकते. मनू अत्री आणि सुमीत रेड्डी या जोडीने आपल्या खेळात आणखी सुधारणा करावी लागणार आहे. ली चोंगच्या वलयावर अवलंबून न राहता संघ म्हणून त्यांना एकत्रित कामगिरी करावी लागणार आहे.