सायना नेहवाल आणि ज्वाला गट्टा- भारताच्या या रणरागिणींनी एकेरी आणि दुहेरी प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवला आहे. आपापल्या क्षेत्रात मातब्बर असणाऱ्या या दोघी इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) स्पर्धेत एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत. आयबीएल स्पर्धेचा ताफा आता दिल्लीकडून लखनौला रवाना झाला आहे. शनिवारी लखनौ येथे होणाऱ्या लढतीत ज्वालाचा क्रिश दिल्ली स्मॅशर्स आणि सायनाचा हैदराबाद हॉटशॉट्स संघ आमनेसामने असणार आहेत. सलामीच्या लढतीत क्रिश दिल्ली स्मॅशर्सला पुणे पिस्टन्स संघाने पराभूत केले होते, तर हैदराबाद हॉटशॉट्स संघाने सायनाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अवध वॉरियर्सवर मात केली होती.  
हैदराबाद येथे सायना नेहवालला गवसलेला सूर महत्त्वाचा आहे. गुआंगझो येथे नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूला सरळ सेट्समध्ये मात करत सायनाने दिमाखदार सुरुवात केली आहे. सायनाकडून अशाच विजयी कामगिरीची हैदराबाद संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. पुरुष एकेरीच्या लढतीत अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सलामीच्या लढतीतील पराभव विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी अजय उत्सुक आहे. मिश्र दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सॅपसिरी जोडीने विजय मिळवल्याने हैदराबाद संघ मजबूत झाला आहे. एकेरी प्रकारात तॅनओनग्सकने विजय मिळवल्याने हैदराबाद संघाची चिंता मिटली आहे.
क्रिश दिल्ली स्मॅशर्सला हैदराबादविरुद्ध पराभव झटकून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ज्वाला गट्टा आणि किइन किट कू या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच्या जोडीला एकेरीत एच.एस. प्रणॉयचाही पराभव झाल्याने दिल्लीच्या चिंता वाढल्या आहेत. महिला एकेरीत निचॉअन जिंदापॉनही पराभूत झाल्याने दिल्लीला आपल्या रणनीतीचा पुनर्विचार करावा लागणार आहे.