घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात हैदराबाद हॉटशॉट्सने झंझावाती खेळ करत पुणे पिस्टन्सला निष्प्रभ केले आणि दिमाखात इंडियन बॅडमिंटन लीग(आयबीएल)ची अंतिम फेरी गाठली. हैदराबादची आयकॉन खेळाडू सायना नेहवालने तुफानी खेळ करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. उपांत्य फेरीच्या या पहिल्या मुकाबल्यात हैदराबादने पहिल्या तीन लढतीमध्येच पुण्यावर मात केली. बाद फेरीच्या नियमांमुळे तीन निर्विवाद विजयांसह हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली.
सलामीच्या लढतीत अजय जयरामने पुण्याच्या तिअन मिन्ह न्युगेनवर २१-१७, २१-११ अशी खळबळजनक मात केली. नेटजवळून सुरेख आणि शैलीदार खेळ, क्रॉसकोर्ट, स्मॅशचा प्रभावी उपयोग करत अजयने हैदराबादला १-० आघाडी मिळवून दिली. जबरदस्त ऊर्जेसह खेळणाऱ्या अजयने कमीत कमी चुका केल्या आणि आपल्या अचूक खेळाने न्युगेनला चुका करायला भाग पाडले.
दुसऱ्या लढतीत सायना आणि ज्युलियन शेंक यांच्यात चुरशीचा मुकाबला रंगला. पहिल्या गेममध्ये सायनाने दमदार स्मॅशेसच्या फटक्यांच्या जोरावर शेंकला नामोहरम केले. तिच्या हातून झालेल्या चुकांचाही सायनाने पुरेपूर फायदा उठवला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी दुसऱ्या गेममध्ये शेंकने प्रदीर्घ रॅलींवर भर देत सायनाची दमछाक केली. नेटजवळून सुरेख खेळ करत शेंकने हा गेम जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोघींमध्ये एकेका गुणासाठी संघर्ष झाला, मात्र प्रेक्षकांच्या आवाजी पाठिंब्याच्या बळावर सायनाने शेंकला २१-१०, १९-२१, ११-८ असे नमवत हैदराबादला २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेतील सायनाचा हा सलग सहावा विजय आहे.
तिसऱ्या लढतीत हैदराबादच्या व्ही. एस. गोह आणि के. लिम यांनी जे. एफ. नेल्सन आणि सनावे थॉमस जोडीवर २१-१६, १४-२१, ११-७ असा विजय मिळवला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्याकरिता नेल्सन-थॉमस जोडीने आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरले.